Thursday, 28 July 2022

जि. प. पू. प्रा.शाळा रूण क्रमांक १ चा अमृतमहोत्सव दिवस उत्स्फूर्तपणे साजरा !

जि. प. पू. प्रा.शाळा रूण क्रमांक १ चा अमृतमहोत्सव दिवस उत्स्फूर्तपणे साजरा !


मुंबई, (दिपक मांडवकर/ राजन सुर्वे ) :
         
        रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील रुण गाव तसे प्रख्यात आहे. पण 'ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते... त्या ज्ञानाचे मंदिर हे...' अशी प्रार्थना म्हणून शाळेत जाणारे माझे बालपण आज प्रौढत्वाकडे आले आहे. पण त्या आधीपासून उभी असणारी 'माझी शाळा' आज अमृत महोत्सवी झाली. म्हणजेच ७५ वर्षाची झाली. या ७५ वर्षाच्या काळखंडात रूण गावाला सुशिक्षित, सुविचारी बनवत प्रगती साधण्यात या शाळेने अतिशय महत्वाची भूमिका बजावली किंबहुना खूप मोठं योगदान दिलेले आहे.


        आज याच शाळेकडे वळून पहाताना हिच्या मातृतुल्य सहवासातील अनेक आठवणी मनात रुंजी घालतात. या शाळेच्या माध्यमातून आमची घडवणूक करण्यात देव झालेला येथील शिक्षक वर्ग आज ही जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदाता ठरत असतो. 
       ज्ञान, कला, कौशल्य, क्रीडा, इत्यादी अनेक जीवनावश्यक क्षेत्रात इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला यशांकित करणारी ही मातीची शाळा अन मातीतला गुरुजन वर्ग विश्व् पसाऱ्यात प्रगतीची पाहुले टाकण्याचे बळ देता झाला. येथे शिकून गेलेले अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व दाखवत आहेत. मागून येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरत आहेत. अनेक पिढ्या इथे घडल्या, वाढल्या, हिच्या अंगाखांद्यावर खेळल्या. रुणातल्या प्रत्येकासाठी ही शाळा न्हवतीच मुळी हा तर एक परिवार होता, आहे. 
           त्या मागील आठवणीत रमताना आधीच्या पिढीकडून चर्चेत असलेले शिक्षक म्हणजेच 'कोयंडे गुरुजी' ज्यांनी शाळेचे रुपडे अंतरबाह्य बदलण्यात महत्वाचे योगदान दिलेले आहे. त्या नंतर माझ्या स्मृती मंदिरात देव ठरलेले अनेक शिक्षक यामध्ये आमच्या वेळाचे कदम, पवार, साळुंखे, लांजेकर, जोशी, केरकर, कोळंबेकर, पटेल, सनगरे, सरपोतदार गुरुजी, नेरुळकर, परब बाई इत्यादींनी तसेच प्रत्येक काळातील गुरुजनांनी आम्हाला शिक्षणाचे अमृत पाजत सुशिक्षित सुविचारीच नव्हे तर समृद्ध देखील केलं. इथेच गावात मिळेल त्या घरात, उपलब्ध असेल त्या सोयीत रहात शिक्षकांनी ज्ञान देण्यात कुठे ही कुचराई केली नाही. रूण गावाच्या मागील ७५ वर्षाच्या वाटचालीत गावाच्या प्रगतीला, विकासाला गती देणारे हे ज्ञान भांडार मंदिर आणि तिथे झटणारे शिक्षक आम्हाला देव भासतात. 
      आमच्यातील कला कौशल्याची पारख करून त्याला व्यासपीठ देऊन जगाच्या मंचावर यशाची चव चाखायला लावणारी ही आमुची खेड्यातील शाळा शहरांच्या वलयंकित कर्तृत्व घडविण्याच्या स्पर्धेत कुठे ही कमी नाही. उलट इथल्या मातीच्या भिंती, जमीन हिने नेहमीच उत्तम संस्कार देत आकाशाला गवसणी घालतानाच पाय जमिनीवर ठेवण्याची जाणीव दिली.
     आज या शाळेच्या इमारतीकडे पाहताना ही शाळा माय बाप, ग्रामदेवता, मंदिर भासते आणि नकळत हात जुळले जातात. खऱ्या अर्थाने देव असणारी ही शाळा आमच्या सर्वांचे आयुष्य,भविष्य उज्वल करती झाली. इथला गुरुजन वर्ग मार्गदाता झाला. आज अमृत महोत्सव साजरा करताना इथल्या अमृतमय क्षणांची उजळणी तर होतेचे.. मात्र गावाच्या उज्वल भविष्यासाठी या शाळेचे अनन्य साधारण महत्व ही लक्षात येते. ही शाळा अन गावाची जडणघडण होतच राहील. इथून विश्व् विजेत्यांची फौज बाहेर पडत राहील. प्रगतीचे पंख मिळून नाव पैलतीरी होईल होत राहो हिच सदिच्छा. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

1 comment:

  1. सुंदर अभिनंदन

    ReplyDelete

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !! उरण, दि २८, (विठ्ठल ममताबादे) : सामाजिक कार्यात न...