Sunday 30 October 2022

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थकारणावर चीनचा दबदबा : 'प्रा. अलका आचार्य'

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थकारणावर चीनचा दबदबा : 'प्रा. अलका आचार्य'


मुंबई, (गुरुदत्त वाकदेकर) : क्षेत्रीय एकात्मिकता, राष्ट्रशक्तींचे बळकटीकरण, जागतिक अर्थव्यवस्थेत भक्कम सहभाग, देश-विदेशातील विविध संस्था तसेच संघटनांना अधिकांश मदत करण्याची नीती, जगभरात गुंतवणूक यातूनच चीनच्या जागतिक नीतीची चालना आणि परिणामकता दिसून येते, आपल्या बलस्थानातून त्यांनी जागतिक स्तरावर स्थान भक्कम केले आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार व अर्थकारणावर दबदबा निर्माण केला आहे, असे विश्लेषण `चीनची जागतिक नीती – चालना आणि परिणामकता’ या विषयावर चायनीज स्टडीज इन्स्टिट्यूटच्या माजी संचालिका तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या माजी सदस्या प्रा. अलका आचार्य यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने वरळी येथील नेहरू केंद्रात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.

आपल्या विषयाचे सखोल विवेचन करताना त्यांनी अनेक मुद्यांचा उहापोह केला. सर्वाधिक औद्योगिकरण, जागतिक पातळीवर परिणाम करु शकेल, अशी प्रभावशाली अर्थव्यवस्था आणि व्यापारीकरण, विविध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये अग्रणी, जागतिक दर्जाची विद्यापीठे, विज्ञान आणि तंत्रज्ञानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अव्वल संशोधन, सर्वाधिक पेटंटधारक राष्ट्र, उर्जेचा विपुल प्रमाणात नियोजनबद्ध वापर, परकीय गुंतवणूकधारांना सदैव आकर्षक करणारी व्यवस्था, सैन्यदलाचे आधुनिकीकरण ही चीनची बलस्थाने आहेत. त्याच्या आधारे त्यांनी जागतिक स्तरावर आपले स्थान भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. `चायनास बेल्ट अँड रोड इनिशिएव्हिट’ या कार्यक्रमांतर्गत चीनने आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच अर्थकारणावर दबदबा निर्माण केला आहे. अमेरिकेबरोबर तुल्यबळ राहण्याचा प्रयत्न सैन्याच्या आधुनिकीकरणातून केला आहे. तिबेट, तैवान आणि दक्षिण चीनलगतच्या भागांचे सार्वभौमत्व निर्माण केले आहे. या मुद्यांनाही त्यांनी स्पष्ट केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे यशवंतराव चव्हाण सामाजिक विज्ञान संशोधन केंद्र मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदवीसाठी आता मान्यताप्राप्त आहे. सामाजिक कार्य तसेच सार्वजनिक धोरण संशोधन यासाठी ते महत्वाचे असून त्यानुसार विकसित करण्यात येणार आहे. या केंद्राची औपचारिक घोषणा करण्यासाठी तसेच प्रमुख कार्यक्रमांपैकी एक म्हणून परराष्ट्र धोरणावर मुंबईचा दृष्टीकोन विकसित करण्यासाठी संशोधन केंद्राने परराष्ट्र धोरणावर मुंबई संवाद ही एक वर्षभर चालणारी सार्वजनिक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यापुढील काळात केंद्राच्या माध्यमातून अशा स्वरुपाचे उपक्रम होणार असून त्यातून विविध विषयांवर वैचारिक मंथन होईल. पंडित नेहरू तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या सकंल्पनेतील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ते महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्रोत्यांच्या प्रश्नांना प्रा. अलका आचार्य यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...