Sunday 27 November 2022

"मृदगंध" पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण !

"मृदगंध" पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लोकशाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. १२व्या लोकशाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृदगंध पुरस्कार २०२२ चे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी अॅड. आशिष शेलार, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, पद्मभूषण उस्ताद राशीद खान, पराग लागू, नंदेश उमप मंचावर उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की,आज ज्यांना मृदगंध पुरस्कार दिला गेलाय त्या सर्व व्यक्ती कर्तृत्वाने हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत. त्यांना पुरस्कार द्यायला मिळणे हाच माझ्याकरता एक मोठा पुरस्कार आहे. इथे या सर्व लोकांच्या मनोगतातून, गायनातून या कार्यक्रमाची उंचीही प्रचंड वाढली आहे. राजकारणात तीरस्कारालाही तोंड द्यावे लागते मात्र या मंचावर येऊन जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे.

विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे २६ नोव्हेंबर रोजी १२वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह तसेच २०२२ सालचे मृदगंध पुरस्कार रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार त्यांच्या समवेत आमदार अॅड. आशिष शेलार, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.  

कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. २६/११ च्या कटू स्मृती आणि भारतीय संविधान दिनाच्या गोड आठवणी जाग्या करून संगीत समारोहाला सुरूवात झाली. मुंबईच्या कोकण कन्या बँडने अगदी अलवारपणे आपल्या सुरांची जादू संपूर्ण सभागृहात पसरली. बघता बघता सारे सभागृह त्यांच्या सुरांच्या तालावर लयबद्ध ठेका धरून गाऊ लागले. एकसंध तालासुरात ह्या कन्यांच्या  सप्तसुरांत सारे सभागृह रममाण झालेले असतानाच सांस्कृतिक कार्य व वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांचे आगमन झाले आणि समीरा जोशी यांनी खास त्यांच्यासाठी छत्रपती शिवरायांच्या गीतांचं सादरीकरण करण्याची विनंती केली. आणि आहा त्यानंतर जो काही माहोल तयार झाला तो शब्दातीत होता. खुद्द मंत्री महोदयांनी देखील मनसोक्त दाद दिली.

त्यानंतर पारितोषिक वितरणाच्या मुख्य कार्यक्रमात श्री. फ. मु. शिंदे - जीवन गौरव, रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे - सामाजिक क्षेत्र, संजय मोने व सुकन्या मोने - अभिनय क्षेत्र, रवींद साठे - संगीत क्षेत्र, श्रीमती कमलाबाई शिंदे - लोककला, श्रेया बुगडे - नवोन्मेष प्रतिभा यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार त्यांच्या समवेत आमदार अॅड. आशिष शेलार, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.  

सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उस्ताद राशीद खान हे यंदाच्या स्मृती संगीत समारोहाचे खास आकर्षण ठरले. प्रदीर्घ काळानंतर गायक आणि मुंबईचे रसिक प्रथमच सामोरे आले होते. आपली गायकी सादर करत असताना त्यांनी साथसंगत करत असलेल्या आपल्या सहकलाकारांनाही त्यांची गुणवत्ता दाखवण्याची संधी दिली. स्वतः गात असताना प्रेक्षकांना स्वतःसाेबत गाण्याची संधी त्यांनी दिली. स्मृती संगीत समारोहाच्या उत्तरार्धाची सांगता त्यांच्या 'आओ गे जब तुम साजना" ह्या गाण्याने होत असताना रसिकांचे डोळे, कान आणि मन तृप्त झाले होते.  
डॉ. समीरा गुजर जोशी यांनी सोहळ्याचे समयसूचक सूत्रसंचालन केले. सर्व पुरस्कार्थींच्या मानपत्रांचे वाचनही त्यांनी त्यांच्या खास पद्घतीने केले. त्यामुळे सभागृहात असलेल्या सर्वांसोबतच पुरस्कार्थीही दाद देत होते. या मानपत्रांचं सुंदर शब्दांकन आनंद खासबागदार यांनी केले.
आपल्या गायकीच्या कारकिर्दीची पन्नाशी गाठत असणार्‍या रवींद्र साठे यांनी "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" हे गीत सादर केलं आणि सभागृहाने त्यांच्या सुरामध्ये आपला ताल मिसळला.  
विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्कारास लागू बंधू यांनी सहकार्य केले. पुरस्काराचे शिस्तबद्घ आयोजन सुप्रसिद्ध गायक, शाहिर तसेच विठ्ठल उमप फाऊंडेशनचे सर्वेसर्वा नंदेश विठ्ठल उमप, सरिता नंदेश उमप आणि कुटुंबीय तसेच सहकार्‍यांनी अगदी लिलया केले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...