सावकाराच्या जाचाला कंटाळून रेल्वेखाली आत्म हत्त्या, आत्महत्ये पूर्वी केला व्हिडिओ व्हायरल !
भिवंडी, दि२९, अरुण पाटील (कोपर) :
सावकारांच्या जाचाला कंटाळून उल्हासनगर मधिल एका व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृताने आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे कारण स्वतःच्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.
गिरीश नंदलाल चूबे (वय ३५;रा.उल्हासनगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो उल्हास नगरमधील कॅम्प नंबर पाच परिसरात पत्नी आणि दोन मुलासह राहत होता. लॉकडाऊन पासून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने त्याने काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते.
मृतक गिरीश हा उल्हासनगर मधील एका खासगी कंपनीत कामाला होता. मात्र दोन महिन्यापूर्वी या कंपनीत काम करणाऱ्या जय आणि विनोद या दोघांनी त्या कंपनी मालकाला गिरीश बद्दल उलटसुलट सांगितल्याने मालकाने गिरीशला नोकरीवरून काढून टाकले होते. नोकरी गेल्याने आपल्यावर एक लाखापर्यंत कर्ज झाले असल्याचे मृत गिरीशने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. बेरोजगारी आणि कर्जाच्या नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे व्हिडीओत नमूद केले.
गिरीशने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने रेल्वे रुळावर लोकल येण्याआधीच स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून ते नातेवाईक आणि मित्राला पाठवले होते. त्या घटनेमुळे सावकारी जाच एखाद्याच्या जीवावर कसा बेतू शकते याचा प्रत्यय या व्हायरल व्हिडीओ मधून समोर आला आहे.
गिरीशने सुसाईड नोट देखील लिहिली आहे. त्यामध्ये ४० टक्के व्याजाने पैसे देणाऱ्या सावकरांसह चार ते पाच सावकरांना कंटाळून आणि बेरोजगारीमुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार त्याने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.
तत्त्कालीन दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात सावकार विरोधी कायदा अंमलात आणला होता. त्यामुळे त्यावेळी व्याजाने पैसे देणारे राज्यभरातील अनेक सावकारांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली होती.
हीच संधी साधून पुन्हा राज्यभरात बेकायदा व्याजाचा गोरखधंदा करणाऱ्या सावकरांचे पेव फुटल्याचे गेल्या दोन वर्षांत सावकारी जाचाला कंटाळून झालेल्या आत्महत्यांच्या घटनेवरून दिसून येते. दुसरीकडे घराचा एकमेव कमावता व्यक्ती गेल्याने चुबे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
No comments:
Post a Comment