Saturday 29 July 2023

माजिवाडा, ते वडपे दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवावेत - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

माजिवाडा, ते वडपे दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवावेत - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे, दि. २९ - मुंबई -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवून प्रवाशांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी माजिवाडा, खारेगाव नाका ते वडपे या मार्गावरील खड्डे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने बुजवावेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते तेथील कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावीत. यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय अधिकारी नेमून लक्ष ठेवावे, असे निर्देश केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिले. 

भिवंडी तालुक्यातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीसंदर्भात आज श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमुख, ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त डॉ. विनय राठोड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप, महामार्ग पोलीसांचे अधिक्षक मनोज दहिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विलास कांबळे, यांच्यासह महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

पावसाळ्याच्या कालावधीत खारेगाव नाका ते मानकोली, मानकोली ते राजनोली व राजनोली ते वडपे आणि या मार्गातील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करून सुरळीत वाहतूक होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत. एमएसआरडीएने या मार्गावरील खड्डे मास्टिक पद्धतीने बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. आवश्यक तेथे जास्तीचे मनुष्यबळ कामास लावावे. दिवे, ओवळी, पिंपळास आदी ठिकाणी मोठी वाहने रस्ता ओलांडताना कोंडी होती. ती दूर करण्यासाठी या ठिकाणी हाईट बॅरिअर लावण्यात यावे. पाईपलाईनच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. या कामांवर संनियंत्रण ठेवण्यात यावे. वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले. 

सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जड-अवजड वाहनांना बंदी घालावी, ही अवजड वाहने रात्रीच्या वेळेस पाठविण्यात यावी. दरम्यानच्या काळात दिवसा ही अवजड वाहने शहापूरमधील खर्डी येथे थांबविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. तसेच नाशिकवरून येणारी अवजड वाहनांची वाहतूक मुरबाडमार्गे वळविण्यासंदर्भात संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. माणकोली व रांजणोली उड्डाणपुलाखाली वळण मार्ग तयार करावेत, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनीही मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी एमएसआरडीसी व इतर यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी मार्गावरील दुरुस्तीची कामेही पूर्ण करावीत. आवश्यक तेथील अंडरपासच्या ठिकाणी दुरुस्ती करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावे. गर्दीच्या वेळेस अवजड वाहने शहापूरजवळ थांबविण्यात यावेत. तसेच कमी गर्दीच्या वेळेस ही वाहने टप्प्या टप्प्याने सोडण्यात यावीत. शहापूर ते सापगाव रस्ता दर्जोन्नत करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...