Monday 4 September 2023

नाशिक येथे दुध भेसळीचा पर्दाफाश, अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त !!

नाशिक येथे दुध भेसळीचा पर्दाफाश, अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त !!


नाशिक, प्रतिनिधी : सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीवर ग्रामीण पोलिसाच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. छाप्यात सुमारे ३०० गोण्या मिल्क पावडर, ७ गोण्या कॉस्टिक सोडा असा ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भेसळ करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वावी पोलिस ठाणे हद्दीतील मिरगाव येथील दूध संकलन केंद्रात काही इसम संशयास्पदरीत्या किटल्यांमधून पांढरे रंगाचे द्रवपदार्थाचे मिश्रण दुधात मिसळत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. सदर बातमीप्रमाणे शनिवारी (दि. २) सकाळच्या सुमारास ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मीरगाव येथील ओम सद्गुरू दूध संकलन केंद्र येथे छापा टाकला. सदर ठिकाणी डेअरीचालक संतोष विठ्ठल हिंगे व प्रकाश विठ्ठल हिंगे (दोन्ही रा. मीरगाव, ता. सिन्नर) हे त्यांचे दूध संकलन केंद्रात संकलित झालेल्या दुधात पांढरे रंगाचे द्रव पदार्थाचे मिश्रण टाकताना दिसून आले.

त्याठिकाणी मिल्की मिस्ट नावाची रासायनिक पावडर व कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कॉस्टिक सोडादेखील मिळून आला. त्यानंतर पोलिस पथकाने डेअरी चालकाचे राहत्या घराची झडती घेतली असता, त्याचे घरी कॉस्टिक सोडा व डेअरीचे दुधात मिक्स करण्यासाठी वापरण्यात येणारी स्किम मिल्क पावडरचा साठादेखील मिळून आला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिक यांच्या मदतीने कारवाई सुरू असून, बावी पोलिस ठाणे येथे संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, विशेष पथकातील पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, सहायक पोलिस उपनिरीक्षक शांताराम नाठे, दीपक आहिरे, हवालदार विनोद क टिळे, गिरीश बागूल, अनुपम जाधव, मेघराज जाधव, किशोर बोडके, साईनाथ सांगळे, भगवान काकड, मपोकों सविता फुलकर, चालक हेमंत वाघ यांच्या पथकाने सदर कारवाई सहभाग घेतला.



No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...