Tuesday 31 October 2023

देशाचा आत्मा म्हणजे कष्टकरी शेतकरी- कोकणात भात कापणीला वेग !!

देशाचा आत्मा म्हणजे कष्टकरी शेतकरी- कोकणात भात कापणीला वेग !!

"शेतकरी जगला, तर देश जगेल; शेतकरी संपला तर हा देशही संपेल."

               शेतकरी ही शेती धारण करणारी व्यक्ती असते. शेेती कसणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. 'गावगाडा'कार त्रि.ना.आत्रे 'गाव वसविण्याचे आणि जमीन वहीतीला आणण्याचे' श्रेय शेतकऱ्यांना देतात. त्यांच्या मते खेडणे म्हणजे जमिनीची मशागत करणे आणि खेडुत म्हणजे जमीन कसणारा. असा प्रत्यक्ष जमीन कसणारा मालक असो वा कुळ, मिरासदार असो वा बटाईदार. प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते.

              रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली हे माझं गाव. गावात सर्व जाती-धर्माचे लोक रहातात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावात जि. प. शाळा आंगवली, जनता विद्यालय आंगवली, सोमेश्वर मंदिर. मार्लेश्वर देवालय (मठ) याशिवाय अनेक आवश्यक सोयी -सुविधा उपलब्ध आहेत.माझा जन्म याच गावात झाला. शिक्षण पण येथेच झाले. शालेय जीवनात खूप सारी मस्ती.. धमाल केली. वडील शेतकरी असल्यामुळे सुट्टी दिवशी मी पण गंम्मत म्हणून शेतात जात असे. यातील खास मज्जा यायची ती पावसाळी शेती कामात. आई -बाबा, दोन भाऊ, दोन बहिणी, दोन वहिनी सतत शेती कामात मग्न असायचे. मी गंम्मत म्हणून शेतावर जात असे. ते दिवस आज (५२व्या वर्षी) जरी आठवले तरी सर्व वाडी, गाव आणि सर्व माणसं डोळ्यासमोर येतात.भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात.पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला 'कृषी प्रधान देश' म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कणा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे १७% योगदान आहे.  शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. या शिवाय दर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते.शेतकरी सकाळी लवकर उठतो आपले बैल आणि इतर सर्व सामान घेऊन शेताकडे निघतो. तासनतास तो शेतात काम करतो. शेतकऱ्यांच्या घराचे इतर लोक सुद्धा शेतात त्याची मदत करतात. शेतकऱ्याचे जेवण अतिशय साधे असते. बरेच शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढत असतात. दुपारी शेतकऱ्यांच्या घरून त्याची पत्नी किंवा दुसरे कोणीतरी जेवण घेऊन येते.शेतकरी जेवण करून काही मिनिटांच्या विश्रांती नंतर पुन्हा आपल्या कामाला लागतो. तो कठीण परिश्रम करतो.पण एवढ्या परिश्रमानंतर देखील त्याला जास्त लाभ होत नाही अशी खंत आंगवली रेवाळे वाडी येथील शेतकरी श्री. शशिकांत शां. आग्रे यांनी व्यक्त केली.

              नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामाला गावी आली आहेत. सुशिक्षित तरुणांना शेतीत रस निर्माण झाला असून शेतकामात आता शिकला सवरलेला वर्ग दिसून येत असल्याने कृषी क्षेत्रात हा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेत आहेत. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने कामे जलदगतीने आटपून घेत आहेत.काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्री चा वापर करीत आहेत. यामध्ये श्रम वेळ व पैसा बचत होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी भात झोडणीच्या कामात व्यस्त झाला असून मळणी काढण्यासाठी सकाळी लवकरच शेतात दाखल होत आहेत. भात कापणी, भात वाळवणे, पेंढ्याची उडवी रचणे या कामाला आता चांगलाच वेग आला आहे. ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. खळ्यांमध्ये पडलेला भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे.

                 या देशाची माती सर्जक आहे. ती पोसणारी, भाईचारा जपणारी आहे. आपल्या व्रात्य, भ्रमिष्ट लेकरांनी (धरतीपुत्रांनी) केलेले अत्याचार सहन करूनही ती त्यांना ममत्वाने पुन्हा अन्नाचे चार घास भरवून जगण्याचा अवसर देते. तिच्यात ममत्व आहे, तसं दातृत्वही. ती विषमता नव्हे, तर समता उगवते. द्वेष नव्हे, बंधुभाव जगवते. ती खिळे उगवत नाही, तर अन्न पिकवून देते. ती विषपेरणी नव्हे, तर माणुसकीची पेरणी करते. हिसकावून घेणं नव्हे, तर देणं शिकवते. ती हात उगारायला नव्हे, तर कष्टानं हाताला घट्टे पाडायला शिकवते. ती उलटायला नव्हे, तर जागायला शिकवते. ती परजीवी नव्हे, श्रमजीवी आहे. ती बांडगूळ नव्हे, तर करोडो पोटांना जगवणारी आहे. ती विद्वेषी नव्हे, तर सहिष्णू आहे. ती एकचालकानुवर्ती नव्हे, तर लोकचालकानुवर्ती आहे. ती एकवचनी नव्हे, बहुवचनी आहे. माती म्हणजे जीवन. शेती म्हणजे जीवनपद्धती, जगण्याची संस्कृती. या देशाची नस. मृत्यूनंतर उदरात सामावून एकजीव करणारी. तिच जन्म देते, तिच जगवते, तिच पदरी घेते. हाच शेतकरी धर्म, हीच भूमाता. भारतमाता. कृषिसंस्कृती! या शेतकरी धर्माचा आम्ही पूर्ण आदरसन्मान करतो. तिचे शेतकरीपुत्र अन्यायाला, दडपशाहीला डरत नाहीत. सहिष्णुता, अहिंसा आणि लोकशाही मार्गाने आपला लढा व्यापक करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्येच आहे. जी गांधीजींना आकळली होती. म्हणूनच कृषिसंस्कृतीशी नाळ असलेला एक तरुण या नात्याने या शेतकरी लढ्याला, आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना कृतज्ञतापूर्वक सलाम करणं, त्यांच्या अतूट धैर्याला मानवंदना देणं, त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करणं, त्यांच्या सोबत राहणं, हे एक भारतीय म्हणून माझं कर्तव्य आणि जबाबदारी समजतो...खंत इतकीच की, अन्नदात्यालाच टाच रगडून, अत्याचार सहन करून न्यायासाठी झगडावं लागणं, यासारखं शिवछत्रपती-जोतीराव फुले-भगतसिंह-महात्मा गांधी, साने गुरुजी, आंबेडकर आणि लोहिया आदींच्या योगदानातून स्वातंत्र्य-समता-धर्मनिरपेक्षता या लोकशाही मूल्यांवर उभ्या राहिलेल्या देशात यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणते?

              शेतकऱ्याचे जीवन खूपच साधे असते. त्याचा पेहराव ग्रामीण असतो. बरेच शेतकरी कच्या घरात राहतात. शेतकऱ्याची संपत्ती बैल आणि काही एकर जमीन असते. शेतकरी हा देशाचा  आत्मा असतो. लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' चा नारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे. म्हणून आज शेतकऱ्याला सरकार द्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी.त्यांना शेताचे सर्व आधुनिक यंत्र व कीटनाशके उपलब्ध करून द्यायला हवेत. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे राहणीमान, जेवण साधे जरी असले तरी शेतातील बांदावर बसून केलेल्या जेवणाची चव खूप भारी असते. एखाद्या हॉटेल मधील टेबलावर बसून केलेल्या  जेवणापेक्षा उत्तम असते. हातावर भाकरी.. चटणी.. भाजी..झुणका भाकर... पावसापासून सुरक्षित म्हणून डोक्यावर  प्लास्टिक कागद किंवा घोंगडी.. अशा परिस्थितीत जेवण करताना एक वेगळाच आनंद मिळतो.काय ती  माती..... काय ती शेती...काय तो  सुगंध... काय ते कष्ट....काय मग येताय का बांदावरील जेवणाची मज्जा घ्यायला आमच्या कोकणात ...! कारण "शेतकरी जगला, तर देश जगेल; शेतकरी संपला तर हा देशही संपेल." हे कटू सत्य नकरण्यासारखे नाही.

शांताराम ल. गुडेकर, 
दै. अग्रलेख
मुंबई /कोकण विभागीय संपादक 
पार्क साईट विक्रोळी (प.)
मुंबई -७९, (मो. +91 98207 93759)

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...