डोंबिवली , सचिन बुटाला : डोंबिवली पूर्वेकडील पलावा हा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा कोणताही भार महापालिका प्रशासनावर येत नसतानाही येथील रहिवाशांकडून संपूर्ण कराची आकारणी केली जात होती. पलावामध्ये सुमारे २६ हजार फ्लॅट आहेत. हा आयटीपी प्रकल्प असून या प्रकल्पधारकांना नियमानुसार मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजू पाटील यांच्या कडून केली जात होती.
महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात २० नोव्हेम्बर २०१८ रोजी आयटीपी प्रकल्पामधील नागरिकांना मालमत्ता करात ६६ % सवलत देण्याचे परिपत्रक सरकारने काढले होते. मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नव्हती. कारण तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे हे कार्यरत असताना त्यांनी खोणी पलावा येथील नागरिकांना मालमत्ता करात सवलत दिली होती.
दरम्यान, या संदर्भात महापालिकेचे या आधीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्यांची निर्णय घेण्याआधीच बदली झाली. या संदर्भात आमदार राजू पाटील यांनी २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे सांगितले होते.
आयुक्तांनी या संदर्भात अहवाल सादर करण्यास दिरंगाई केली, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जनहित मागणीचा आदर करीत नागरिकांना ६६ % मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यानिर्णयासाठी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं. तसेच नागरिकांनी जो अधिकचा कर भरला आहे, तो आगामी मालमत्ता करात समायोजित करण्यात यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment