Tuesday 2 January 2024

ठाणे जिल्ह्यातील ४३१ गावांत बुधवारी `स्वच्छतेचा जागर' !!

ठाणे जिल्ह्यातील ४३१ गावांत बुधवारी `स्वच्छतेचा जागर' !!

*डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पंचायती राज विभागाचा उपक्रम*

ठाणे,दि.01 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये बुधवारी (ता. 3) एकाच वेळी `स्वच्छतेचा जागर' केला जाणार आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम गावागावांत राबविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यात गावांच्या  स्वच्छतेचा पायलट प्रकल्प म्हणून हा कार्यक्रम राबविला जाणार आहे, असे श्री पाटील यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय ठेवले आहे. भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे. ग्रामीण भारताचा विकास झाल्याशिवाय भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणार नाही.  त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाने निश्चित केलेल्या नऊ शाश्वत विकास ध्येयातील 'स्वच्छ व हरित गाव आणि आरोग्यदायी गाव" या दोन संकल्पनानुसार 431 गावे स्वच्छ केले जातील. त्याचबरोबर या गावांचे प्रगतीच्या दिशेने पाऊल पडेल. विकसित भारतामध्ये  योगदान देण्यासाठीही  स्वच्छता अभियानाचे महत्त्वाचे योगदान राहील.  या अभियानात ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात  सर्वांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम राबविली जाईल. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम होत आहे. त्यात हजारो श्री सदस्यांबरोबर सरकारी यंत्रणांचा  सहभाग राहणार आहे. यापूर्वी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून वेळोवेळी स्वच्छता उपक्रम हाती घेऊन हजारो टन कचरा साफ करण्यात आला होता. या वेळीही आदरणीय महाराष्ट्रभूषण, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेच्या जागरात सहभागी होण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे आदींची उपस्थिती होती.

नव्या वर्षानिमित्ताने आपण दरवर्षी संकल्प करीत असतो. यंदा आपण स्वच्छतेचा संकल्प करून संपूर्ण ठाणे जिल्हा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू या, असे आवाहन श्री. कपिल पाटील यांनी केले. ३ जानेवारी रोजी ठाणे जिल्ह्यात राबविला जाणारा हा कार्यक्रम राज्यभरात राबवावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

या स्वच्छता अभियानात ठाणे जिल्ह्यातील सर्व जनता, सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते, सरपंच-उपसरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कोकण सुपुत्र चंद्रकांत करंबळे यांना "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड "पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा.श्री.देवेंद्र उपाध्याय यांनी दिल्या अभिनंदनसह शुभेच्छा !!

कोकण सुपुत्र चंद्रकांत  करंबळे यांना  "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड "पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्याय...