Monday 26 February 2024

“शासन आपल्या दारी” अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे -- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

“शासन आपल्या दारी” अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे -- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

*ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे 3 मार्च रोजी "शासन आपल्या दारी" उपक्रमाचे होणार भव्य आयोजन*

ठाणे, प्रतिनिधी - खेड्यापाड्यातील आणि शहरातीलही जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात, यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
      जिल्ह्यात प्रीमियर मैदान, इरा ग्लोबल शाळेजवळ, कल्याण शिळफाटा मार्ग, कोळे, कल्याण येथे दि.3 मार्च रोजी "शासन आपल्या दारी" हे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या विशेष कार्यक्रमाचे पूर्वनियोजन व स्थळपाहणी करण्याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कल्याण येथे भेट दिली, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
      अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यानी कल्याण येथे नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी आज भेट देवून स्थळ पाहणी केली.
      सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
       या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चितच महत्वाचा आहे. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ एकाच दिवशी विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने केला आहे.
       या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार यासह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत.या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत. हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करू,असा विश्वास जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी व्यक्त केला आहे.
      या उपक्रमाच्या नियोजनाकरिता विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी घेण्यात येत आहे. त्यांनी महसूल, कृषी, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या  आकडेवारीची तालुकानिहाय माहिती घेवून या लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेट, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, महानगरपालिका, परिवहन, महामंडळे तसेच इतरही विभांगाना दिल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत पोलीस विभागालाही सूचित केले आहे.
    जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी "शासन आपल्या दारी" या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...