Saturday 30 March 2024

कल्याण तहसील कार्यालयाची दुरुस्ती, मात्र पाणपोई, शौचालय सह इतर गैरसोयींचे काय ?

कल्याण तहसील कार्यालयाची दुरुस्ती, मात्र पाणपोई, शौचालय सह इतर गैरसोयींचे काय ?

कल्याण, (संजय कांबळे) : शासनाला लाखो, करोडोंचा महसूल मिळवून देणाऱ्या कल्याण तहसील कार्यालयाच्या दुरुस्ती काम अखेरीस सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. मात्र कार्यालयातील कर्मचारी तसेच तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या पाणपोई, शौचालय, मुतारी, आदी गैरसोयीचे काय? शिवाय या कार्यालयाच्या पाठिमागे असलेल्या इतर शासकीय खोल्यांच्या डागडुजी चे भिजत घोंगडे कधी गंगेत न्हाहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कल्याण न्यायालयाच्या समोर तहसील कार्यालय आहे, अगदी ब्रिटीश कालीन हे कार्यालय असल्याने याचे बांधकाम सुस्थितीत आहे, कल्याण रेल्वे स्टेशन व बस स्थानक जवळ असल्याने संपूर्ण तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील लोक देखील त्यांच्या विविध कामासाठी या कार्यालयात येत असतात, सध्या या कार्यालयात पुरवठा विभाग, निवासी नायब, तहसीलदार, तहसीलदार, अभिलेख कक्ष, संजय गांधी विभाग, आवक जावक खिडकी, तलाठी कार्यालय, सेतू, मंडळ अधिकारी कार्यालय, आदी विविध कार्यालये आहेत, बाजूला जुनी महात्मा फुले पोलीस चौकी, आरोपीची कस्टडी, तर मागे सर्वे, नागरी संरक्षण विभाग, गोपनीय विभाग, बिनशेती कार्यालय ही कार्यालये आहेत.

कल्याण शहराचे झपाटय़ाने नागरीकरण झाल्याने इतर शासकीय कार्यालयाप्रमाणे याही कार्यालयाला अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे, कल्याण तहसील कार्यालयाबाहेर गाड्या, स्टँम वेंडर, व इतरांनी अशी जागा व्यापली आहे की, या कार्यालयात येण्यासाठी पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी जसे शेताच्या बांधाचा वापर केला जातो, तसी परिस्थिती येथे दिसून येत आहे. येथील अंतर्गत सोईसुविधा ची तर पुरती बोंबाबोंब दिसून येत आहे, शौचालय, मुतारी, पाणपोई, केव्हाच कोरडी पडलेली आहे, तत्कालीन तहसीलदार नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात ही पाणपोई सुरू करण्यात आली होती. मात्र आज तिची अवस्था एकाद्या 'थडग्या, प्रमाणे झाली आहे. आपल्या विविध कामासाठी येणाऱ्या सर्वच वयोगटातील लोकांची खूप गैरसोय होत आहे, त्यातल्या त्यात महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.

कल्याण शहर परिसरात 'डझनभर, लोकप्रतिनिधी असूनही त्यांनी नेमका कोणाचा ? कोणता ? विकास केला, त्यांनी या न केलेल्या विकासाची 'गँरटी, कोण देणार? कोण घेणार?याबाबत कोणी काही बोलायला तयार नाहीत, पावसाळ्यात तर या कार्यालयात  जागोजागी 'ठिबक सिंचन, दिसून येते तर, परिसराला गटाराचे स्वरूप प्राप्त होते, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी दिसून येते. साधारणपणे अडीच ते तीन गुंठे परिसर असलेले हे ठिकाण एखाद्या कोंबड्यांच्या 'खुराड्या, प्रमाणे दिसत आहे, अशात मोर्चा आला तर मग विचारता सोय नाही !

दरम्यान गेल्या कित्येक वर्षांच्या मागणीनंतर कल्याण च्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कार्यालयाच्या डागडुजी चे काम हाती घेतले आहे. प्रथम या कार्यालयाच्या छताचे काम सुरू झाले आहे, छतावर कौलारू पत्रे बसविले जात आहेत, कल्याण मंडळ अधिकारी यांच्या ही कार्यालयावर असे पत्रे बसविले आहेत. हळूहळू संजय गांधी विभाग, बिगरशेती कार्यालय, व शेती कार्यालय असे विभागाचे काम हाती घेतले आहे. तर उन्हाळा असल्याने पाणपोई व शौचालय याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या डागडुजी साठी सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला असून पुढे पुढे इतर सोईसुविधाना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या कार्यालयाच्या मागे असलेल्या इतर शासकीय कार्यालयाचे काम कधी होणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. भविष्यात तरी या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सोईसुविधा मिळतील अशा अपेक्षा व्यक्त करुया !!

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची अवहेलना !! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घडामोडींचे...