Friday 22 March 2024

निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण !!

निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी  अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण !!

** जिल्ह्यात 3 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

रायगड, प्रतिनिधी- निवडणूक विषयक सर्व प्रकिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रायगड जिल्ह्यात वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज अखेर पर्यंत जिल्ह्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

निवडणूक प्रक्रिया हे सांघिक काम आहे. निवडणूक कामात समन्वय महत्त्वाचा असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे.

या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रकिया सुरु होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधीं समोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे. आदींबाबत तसेच मॉक पोल प्रकीयेच्या सुरुवातीपासून ते प्रकिया संपन्न होईपर्यंतची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली.आज अखेर पर्यंत अंदाजे तीन हजार विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची 24 प्रशिक्षणे घेण्यात आली आहेत.बाकी यंत्रणाची प्रशिक्षण प्रक्रिया सुरु आहे. 

 या प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी ज्योत्सना पडियार हे काम पहात आहेत. उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, अजित नैराळे, राहुल मुंडके, मुकेश चव्हाण, जनार्दन कासार, तहसीलदार विकास गारुडकर, महेश शितोळे, स्वाती पाटील, चंद्रसेन पवार, जिल्हा परिषद लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा सूचना अधिकारी निलेश लांडगे यांनी या सर्व अधिकारी कर्मचारी यांना विविध विषयांचे प्रशिक्षण दिले आहे. 

निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेतील विविध घटकांना या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पाडण्यासाठी फायदा होईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची अवहेलना !! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घडामोडींचे...