ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर श्रमिक जनता संघातर्फे न्याय दिंडी !!
.
ठाणे, दि. १८ : आज ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या साठी श्रमिक जनता संघातर्फे तलावपाली, चिंतामणी चौक ते महानगरपालिका मुख्यालय असे न्याय दिंडीचे आयोजन करण्यात आले यात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले तसेच येत्या मंगळवार पर्यंत ठामपा आयुक्त श्री सौरव राव यांच्या बरोबर संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत कामगारांच्या मागण्यांवर चर्चा आयोजित करण्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
यावेळी उपायुक्त (मुख्यालय) श्री जी.जी्गोदेपुरे, उपायुक्त शिक्षण विभाग श्री सचिन पवार आणि घनकचरा विभागाचे उपायुक्त श्री तुषार पवार प्रशासनातर्फे उपस्थित होते. कामगारांच्या वतीने शिष्टमंडळात श्रमिक जनता संघाचे उपाध्यक्ष डॉ संजय मंगला गोपाळ, महासचिव जगदीश खैरालिया, संघटक सुनील दिवेकर, अर्चना पवार, संतोष देशमुख, गणेश चव्हाण, सुरज वाल्मिकी, संतोष खरे आणि विनायक आंब्रे आदी उपस्थित होते.
चिंतामणी चौक, तलावपाली येथून टाळ मृदुंग वाजवत ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर न्याय दिंडीत भरपावसात कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण विभाग, पाणी पुरवठा, मलनिःसारण - यांत्रीक विभाग, रस्ते साफसफाई आदी विविध विभागात वर्षानुवर्ष नियमितपणे सतत सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे ठाणे महानगरपालिका प्रशासना कडून दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेत कंत्राटी सफाई कामगार, वाहनचालक, वाँलमन/ स्लूसमेन आणि अन्य पदावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन अधिनियम नुसार वेतन, भत्ते, बोनस, भरपगारी रजेचे वेतन, वैद्यकीय उपचार सुविधा, गणवेश, वेतनस्लिप, ओळखपत्र आणि सुरक्षिततेची साधने आदी कायदेशीर बाबींची पूर्तता ठेकेदार करत नाही. संबंधित विभागाच्या अधिरार्यांकडून कामगारांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल कामगारांनी नाराजी व्यक्त केली.
खालील मागण्यांचे निवेदन अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी यांना यांना सादर करण्यात आले. कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा ही युनियनचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिला आहे.
१) अत्यावश्यक सेवेतील नियमित स्वरुपाची बारामाही सतत चालणारी कामे करणार्या कंत्राटी कामगारांना कायम कामगारां प्रमाणे वेतन, भत्ते व सोयी सुविधा लागु करा.
२) ठाणे महापालिका शाळेतील सफाई कामगार व अन्य खात्यातील कार्यरत कर्मचारी यांना वयोमानानुसार कमी करण्यात आलेले किंवा मरण पावलेल्या कामगारांना उपदान (Gratuity) ची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी.
३) शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना सार्वजनिक सुट्टीच्या काळात उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत काम द्या / वेतन द्या.
४) कंत्राटी कामगारांना नियमितपणे वेळेवर कायदेशीर वेतन, वेतनस्लिप, गणवेश, ओळखपत्र, सुरक्षिततेची साधने द्या, पावसाळ्यात रेनशूट, गमबूट आदी वाटप करा.
५) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर कामगारांना सुट्टी किंवा जादा कामाचा भत्ता मासिक वेतनात अदा करा.
६) ड्रेनेज लाइन चेंबर आदि सफाई करणाऱ्या जेटिंग गाड्यांवरील १८ सफाई कर्मचारी व वाहन चालकांना रोजगार दया.
७) ठा. म. पा. उपायुक्त मुख्यालय यांच्या दालनात १ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करावी.
८) कायमस्वरुपी व अत्यावश्यक सेवेत कंत्राटी पध्दत बंद करुन सर्व कार्यरत कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावुन घ्यावे. व कायम स्वरुपी कामगारांच्या सारखे वेतन व भत्ते लागु करा.
९) The Prohibition of Employment as Manual Scavengers and Their Rehabilitation Act 2013 या कायद्याची अंमलबजावणी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने इमानेइतबारे करावे. तसेच ठाणे महानगरपालिका हद्दीत एसटीपी टाकी, मलवाहिनी, सीवर चैम्बर्स सफाई करतांना मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या आश्रितांचे सामाजिक न्याय आधारित पुनर्वसन करावे.
मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी दिंडी मोर्चात मुक्ता श्रीवास्तव अन्न सुरक्षा अभियान, लतिका सु. मो व मीनल उत्तुरकर विश्वस्त, समता विचार प्रसारक संस्था, राजेन्द्र चव्हाण व ओसामा - भारत जोडो अभियान, सूर्यकांत कोळी -: सदस्य अनुबंध संस्था, कल्याण, जयश्री शिंदे -: वंचित बहुजन आघडी, पूजा पंडित - घर बचाओ, घर बनाओ आंदोलन तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शर्मिला लोगडे, सुधिता बांदल, विरेंद्र सावंत- फेरीवाला संघटना, अजित डफळे - पर्यावरण संघटना आदींनी आंदोलनात सहभागी झाले होते .
आंदोलन यशस्वी होण्यासाठी श्रमिक जनता संघ चे नरेश घाणेकर, अजय भोसले, किशन सिंग बेदी या कार्यकर्त्यांनी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.
No comments:
Post a Comment