देवतुल्य आई -बाबा माझे गुरु...
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस ! या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु - पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात.
रत्नागिरी जिल्हातील संगमेश्वर तालुक्यामधील श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली(रेवाळेवाडी ) हे माझे गाव.याच गावात माझा जन्म झाला.आई -बाबा शेतकरी.पण शेती काम करता करता त्यांनी मला खूप छान वाढवले. चांगलं शिक्षण दिले.आई हा नेहमीच सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. क्वचितच अशा व्यक्ती सापडतील ज्यांना आई विषयी माया नाही. अनेक लेखक आणि कवींसाठी आई हा असा विषय आहे कि जिच्यावर ते अनेक काव्य किंवा लेख लिहू शकतात. परंतु वडिलांवर काही भव्य दिव्य काव्य किंवा लेखन केलेलं कधी माझ्या वाचनात (काही अपवाद वगळता) आले नाही. आई हि मायाळू, दयाळू, प्रमाची मूर्ती सर्व काही आहे परंतु आपल्या जीवनात वडिलांचं काय स्थान आहे याबद्दल आपण जास्त विचार का नाही करत? वडिलांचा खंबीर आधार आहे म्हणूनच तर आपल घर उभं असत हे आपण किती सहजपणे विसरून जातो. वडील म्हणजे रागीट, कडक स्वभावाचे असेच चित्र बहुधा आपल्या मनासमोर उभे असते. मित्र-मैत्रिणींच्या घरी जाताना आई आहे म्हटलं तरी बिनधास्त जातो पण जर त्यांच्या घरी बाबा आहेत असं म्हटलं तर आपण सांगतो कि ‘तू खालीच ये, बाहेरच भेटूया.’ का असते वडिलांची एवढी भीती आपल्या मनात?
मला वाटत याची सुरवात तेव्हापासून होते, जेव्हापासून घरातले सर्वजण सांगायला लागते ‘पसारा आवर बाबा येतील, अभ्यास कर नाही तर बाबांना सांगेन, हे केलस तर बाबा ओरडतील, ते नाही केलस तर बाबा रागवतील.’ हे सर्व टे आपल्याला शिस्त लावण्यासाठी करत असतील कदाचित पण त्यामुळे नकळत आपल्या मनात वडिलांविषयी आदर सोबत भीती सुद्धा तयार होत असते. ज्या गोष्टींसाठी आपण आईकडे बिनधास्त हट्ट करतो, बाबांना त्याविषयी विचारायला सुद्धा घाबरतो.
स्वतः उन्हात जळून मला सावलीत बसवणारा देवदूत मी वडिलांच्या रूपात पहिला आहे.बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन... स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारे अंतःकरण...माझ्या बाबांचे(लक्ष्मण गुणाजी गुडेकर )दि.८/४/१९९८ ला वयाच्या ७० व्या वर्षी तर आईचे ( गं.भा.जानकीबाई लक्ष्मण गुडेकर )दि.३/३/२००८ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले.बालपणी ऐकावी लागते ज्यांच्या धाकातील शब्दांची धार... मोठेपणी बाबांचे शब्द जीवन जगताना देतात आधार... आज (दि.२१ जुलै) गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्यांनी मला घडवले त्या आई -बाबा यांचे आभार मानतो.देवतुल्य बाबा माझे.. देवतुल्य आई... पुजा रोज करतो त्यांची अन्य देव नाही...!
शांताराम गुडेकर
पत्रकार /वृतपत्रलेखक
विक्रोळी (पश्चिम ), मुंबई -७९
No comments:
Post a Comment