नीरजा वर्तक लिखित आणि आयुष आशिष भिडे दिग्दर्शित दीर्घांक - "घोर" : *एक अप्रतिम नाट्यानुभव*
** त्याच बरोबर नवीन कलाकृती एकांकिका 'काठ'
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
मन सुन्न करणारा आणि जीवनाचं अंतिम सत्य सांगणारा एक नवीन दीर्घांक "घोर" आपल्यासमोर येत आहे. दिग्दर्शक आयुष आशिष भिडे आणि लेखिका नीरजा अविनाश वर्तक यांनी एकत्र येऊन प्रेक्षकांसमोर ही कलाकृती सादर करण्याचे ठरवले आणि आता हे नाटक रंगमंचावर दोन प्रयोग हाऊसफुल्ल करून तिसऱ्या प्रयोगासाठी सज्ज झाले आहे. लिखाण, दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वच पातळ्यांवर सक्षम ठरणारा हा दीर्घांक आहे. दीर्घांकातील गूढता प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
तसेच काठ ही नवीन एकांकिका सुद्धा आयुष आशिष भिडे ह्याने दिग्दर्शन करून व नीरजा अविनाश वर्तक हिने लिहलेली आहे. नदी किनारी म्हणजेच नदीचं काठ त्यावर गावातल्या बायका आपल्या दिनचर्येतील काम करत एकमेकींशी आपल्या मनातील गोष्टी आणि इच्छा सांगून मन मोकळ करतात आणि त्यातून घडणारी एक घटना ह्या सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर येते.
दीर्घांकाचा व एकांकिकेचा दिग्दर्शक आयुष भिडे याने यापूर्वी अनेक मालिका तसेच नाटकांमधे काम करत पारितोषिके पटकावली आहेत. सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील *'प्रेमाची गोष्ट'* या मालिकेत लकी ची भूमिका साकारणारा आयुष भिडे 'घोर' यात अघोरी या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. त्याच बरोबर नीरजा वर्तक ही लेखिका म्हणून उत्तम कामगिरी करत आली असून तिची लेखनाची आवड ह्या दोन्ही कलाकृतीतून आपल्या भेटीस आल्या आहेत. नीरजा वर्तक आणि सायली गावंड यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत. आणि त्यांचं सादरीकरण सुद्धा कौतुकास्पद आहे. कलाकारांचा अभिनय तसेच दीर्घांकाची व एकांकिकेची तांत्रिक बाजूही तितकीच भक्कम असल्याने दोन्ही कलाकृती अधिकाधिक दर्जेदार ठरत. कैलास ठाकूर हा अनुभवी कलाकार असून त्यांची प्रकाशयोजना लोकांना थक्क करून ठेवते, मिहीर जोग यांचे पार्श्वसंगीत दोन्ही कालाकृतींना वेगळा माहोल तयार करण्यात साजेस ठरते. शुभम जाधव,यश जाधव यांचे नेपथ्य,ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगभूषा करणारे शरद विचारे दादा यांची उत्तम साथ दीर्घांकाला आणि एकांकिकेला मिळते. तसेच कैलास मेस्त्री, पूर्वा फडके, कुणाल काटकर, शार्वी वर्तक, साहिल कदम हे रंगमंचावर कलाकृती सादर करून इतर कामं सुद्धा चोख बजावतात आणि समूहातील इतर सहकार्यांची साथ असल्याने एकुणच दीर्घांकाची आणि एकांकिकेची पडद्यामागची बाजूही व्यवस्थित सांभाळली जाते. चिता, पेट घेणाऱ्या चितेचा आवाज, आसमंतात भरून राहिलेला धूर सगळंच चांगल्या अर्थाने अस्वस्थ करणारं ठरू शकेल.
मालिकांमधून अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकत असताना दिग्दर्शक म्हणून नाटकाच्या अनुभवा विषयी विचारले असता दिग्दर्शक आयुष भिडेने सांगितले की, "घोर" हे नाटक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी या पूर्वीही दिग्दर्शन केले आहे पण यावेळी नाटकाचा विषय आणि त्याच्या छटा या अधिक रोचक आहेत. मी सध्या स्टार प्रवाह वरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत लकी हे खेळकर पात्र साकारत आहे. अशातच घोर सारखं एक वेगळं नाटक करायला मिळणं ही माझ्यातील कलाकारासाठी पर्वणीच आहे. हा मुळात दीर्घांक असल्याने प्रेक्षकांसमोर ते सादर करणं त्या विषयी अधिक उत्सुकता आहे. नाटकाच्या कथेबाबत आणि मांडणी बद्दल सांगायच झालंच तर मी नीरजा आणि समूहातील कलाकार जसजसं काम करत गेलो तशा एक एक गोष्टी सुचत गेल्या.
नीरजाने सुद्धा सांगितलं की हा विषय जितका आपल्याला विचार करायला लावतो तितका लिखाणासाठी सुद्धा विचार करायला लावतो. नवीन विषय आणि नवीन गोष्टी ह्या आम्ही बोलत असतो पण अशी कलाकृती माझ्या लिखाणातून बाहेर येणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांनी नेहमीच आतापर्यंत सगळ्याच कामांवर भरभरून प्रेम केले आहे, मला खात्री आहे की यावेळी या दोन्ही कलाकृतीलाही ते चांगला प्रतिसाद देतील."
घोर या दीर्घांकाचा शुभारंभाचा प्रयोग ७ एप्रिलला बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे झाला होता. मुख्य म्हणजे हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला आणि प्रयोग क्र.२ सुद्धा हाऊसफुल्ल होऊन लोकांची व मान्यवरांची खूप छान प्रतिक्रिया आली. यापुढेही "घोर" चे बरेच प्रयोग होतील अशी आशा आहे.
आम्ही रंगकर्मी वेगवेगळ्या कलाकृती घेउन आपल्या भेटीला येत राहणार असल्याचे ह्यावेळी सांगत वसई पश्चिमेला अनंतराव ठाकूर नाट्यगृह (भंडारी हॉल ) येथे शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजल्यापासून घोर आणि काठ दोन्ही कलाकृती पाहण्यासाठी रसिकांनी आवर्जून यावे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
तिकीट दर ₹३००/-
संपर्क : ९०२९१५२२१५ , ८८०६२२९६५४
खूप छान आयुष. तुझे वडिल आशिष भिडे हा माझा खूप चांगला मित्र. बापाच्या पावलावर पाऊल टाकत तू आपली यशस्वी वाटचाल करत आहेस. खूप अभिमान वाटतो तुझा. आभाळभर मोठा हो राजा. God bless you
ReplyDeleteAll the best Aayush and Team 👍👍👍👍.
ReplyDelete