वाडा तालुक्यातील गातेस येथील वैतरणेश्वर शिवमंदिर ठिकाणाला यात्रास्थळ दर्जा देण्याची मागणी !!
🔸 आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून पाठपुरावा
वाडा, सचिन बुटाला : वाडा तालुक्यातील गातेस खुर्द येथील वैतरणेश्वर शिवमंदिर ठिकाणाला यात्रास्थळ दर्जा देण्याची मागणी स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. सदर ठिकाण शहापूर विधानसभा मतदारसंघात येत असून याबाबतची मागणी करणारे निवेदन स्थानिक आमदार दौलत दरोडा यांना नुकतेच देण्यात आले आहे. तर आमदार दौलत दरोडा यांनीही याबाबत तात्काळ दखल घेवून पाठपुरावा सुरू केला असून नुकत्याच झालेल्या पालघर जिल्हा नियोजन समिती व पालकमंत्री यांना याबाबतचे पत्र आमदार दरोडा यांनी दिले आहे. वैतरणा नदीकाठी असणाऱ्या या ठिकाणी स्वयंभू शिवमंदिर असून या परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. या ठिकाणी अनेक भाविक व पर्यटक भेट देत असतात तसेच महाशिवरात्री व श्रावण महिन्यात दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येते. तसेच या ठिकाणी दशक्रिया विधी सुद्धा केले जातात. मात्र या ठिकाणी सुविधांची वाणवा असून वैतरनेश्वर शिव मंदिराला यात्रा स्थळाचा दर्जा मिळाल्यास सभा मंडप, दशक्रिया घाट, जोड रस्ता भक्तनिवास यांसह अन्य सुविधा निर्माण होण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो, यासाठी वैतरनेश्वर या ठिकाणाला यात्रास्थळ दर्जा मिळावा, यासाठी पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, गातेस ग्रामपंचायत सरपंच संजना तरसे, उपसरपंच, प्रशांत गोतारने, सदस्य विधी विकास पाटील व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यांनी आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.
प्रतिक्रिया :
गातेस खुर्द येथील वैतरणा नदीच्या काठी असणारे वैतरणेश्वर शिव मंदिर हे पुरातन शिवमंदिर व स्वयंभू महादेवाचे स्थान असून या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मालकीची मोठी जागा सुद्धा उपलब्ध आहे. सदर ठिकाणी पुरातन काळापासून प्रसिद्ध असून या ठिकाणी भाविकांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी यात्रास्थळ दर्जा मिळावा, ही आमची मागणी आहे.
प्रशांत गोतारणे
उपसरपंच : ग्रुप ग्रामपंचायत गातेस
No comments:
Post a Comment