Sunday 6 October 2024

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा

** संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात हिंदी सप्ताह उत्साहात साजरा

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

          संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी विभागाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हिंदी निबंध, स्वरचित हिंदी कविता लेखन, हिंदी काव्य-वाचन, शेरो-शायरी, गीत गायन, हिंदी शुध्दलेखन, सुंदर हस्ताक्षर, भारतीय वेशभूषा, नृत्य आदि  स्पर्धा आयोजित केल्या होत्या. निसर्गचित्र आणि मोबाईलचा लहान मुलांवर होणारा दुष्परिणाम या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजनही केले होते. विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तब्बल दोनशेहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते. विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

         २३ सप्टेंबर रोजी हिंदी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी पाचपायरी, विरार येथील हिंदी विभागातील सहायक शिक्षिका रानी अनिक चंद्र मिश्रा उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते होते. महाविद्यालयाचे प्रशासक फादर थॉमस लोपेज यांची प्रमुख उपस्थिती होती. उप-प्राचार्य प्रा.सरिथा कुरियन, हिंदी साहित्य मंडळाच्या अध्यक्ष निधी कनोजिया व कार्याध्यक्ष राजन खरवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा गीताने झाली. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्यांनी केले. सोनल मिश्रा ने अप्रतिम लावणी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. रामदास तोंडे यांनी केले व पाहुण्यांचा परिचय ही त्यांनी उपस्थितांना करून दिला. सुमन झा या विद्यार्थिनीने देशभक्तीपर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. विकास गौतम आणि कार्तिकी तामोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोहित विश्वकर्मा यांनी आपल्या शेरो-शायरीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सेमिनार हॉल च्या दर्शनी भागात रानी जयस्वाल, खुशबू राव, कांचन पासी यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. हिंदी भित्तीपत्रिका 'बीज' चे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फादर थॉमस लोपेज यांनी उपस्थितांना आशीर्वाद देऊन कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

          याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. विभुते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या गुणपत्रिकेवरील गुणांना महत्त्व न देता सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी कथा, कविता, गजल, पर्यावरण, निसर्ग याविषयी अधिक जाणून घेतले पाहिजे.  साहित्यामध्ये हृदयाला स्पर्श करण्याची व मनाला आनंद देण्याची अद्भुत शक्ति आहे. साहित्यातून घेण्यासारखे खूप काही आहे. साहित्याचे विविध प्रकार मानवी जीवनाला समृद्ध बनवतात. शेवटी ते म्हणाले की, महाविद्यालयाचा हिंदी विभाग चांगले कार्य करत आहे. डॉ. तोंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सतत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. 

        कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रानी अनिक चंद्र मिश्रा विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाल्या की, विश्वामध्ये हिंदी भाषेचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे. हिंदी भाषा भारतीयांच्या मन, बुद्धी आणि हृदयात विराजमान आहे. हिंदी ही आपल्या देशाची राजभाषा तर आहेच त्याबरोबरच संपर्क भाषा ही आहे. हिंदी भाषेचे साहित्य समृद्ध आहे.कबीर, तुलसीदास, सूरदास, मीराबाई, भूषण प्रेमचंद, भारतेंदु हरिश्चंद्र, जयशंकर प्रसाद, महादेवी वर्मा, निराला आदि साहित्यिकारांनी हिंदी भाषेला एक उच्च दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. हिंदी सोशल मीडिया, सिनेमा आदी माध्यमातही खूप लोकप्रिय आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेसोबतच इतर भाषाही आत्मसात केल्या पाहिजेत. यावेळी त्यांनी एक हिंदी गीत आपल्या सुरेल आवाजात गाऊन उपस्थितांची दाद मिळवली.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामदास तोंडे यांनी केले तर आभार प्रा.रेखा झा यांनी मानले. ग्रंथपाल डॉ.चैतन्य वीर, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अनिल सोनवणे, डॉ. गुणवंत गडबडे, डॉ. दिनेश काळे, डॉ. तेरेसा परेरा, प्रा. इवॉन सखरानी, प्रा. अल्बिना जोशी, प्रा.सुजाता कुलकर्णी, प्रा. डेल्टीना रुमाव आणि विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी कार्यक्रम सफलतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा ** संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात हिंदी सप्ताह...