विक्रोळी पार्कसाईट मध्ये पर्यायी सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिकांची होतेय गैरसोय, पालिकेच्या उदासिनतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी !
मुंबई, (केतन भोज) : विक्रोळी पश्चिम पार्कसाईट प्रभाग क्रमांक १२३ मध्ये मागील काही वर्षामध्ये महानगपालिकेच्या माध्यमातून दुमजली शौचालय बांधण्यात आले होते. आता मात्र गेले काही महिने दुरुस्तीचे कारण देत विभागातील संकल्प सोसायटी, जय हिंद सोसायटी, साईराम सोसायटी, शिव सृष्टी सोसायटी, निलकंठेश्वर सोसायटी, जय भवानी सोसायटी, श्री राम सोसायटी, गुरुकृपा शेजार सोसायटी येथील दुमजली सार्वजनिक शौचालय पडण्यात आले असून, येथील स्थानिक नागरिकांची विशेषतः महिलांची शौचालया अभावी गैरसोय होत आहे. परिणामी या सर्व सोसायटी मधील सर्व नागरिकांना फक्त एकच शौचालय दिले गेले असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महापालिकेच्या एन विभागा मार्फत याठिकाणी आता पर्यायी म्हणून नागरिकांसाठी शौचालय देण्यात आले असले तरी त्याठिकाणी असलेल्या शौचालयाच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे, तसेच काही नागरिकांना शौचालयासाठी विभागा बाहेर असलेल्या पे शौचालय मध्ये पैसे देऊन जावे लागत असल्याकारणाने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तरी विभागांतील संबंधित शौचालयाच्या बांधकामांचे ठेकेदार आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये याबद्दल काही संगनमत आहे का ? असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. याशिवाय महापालिका मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment