अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शाहीर शाहिद खेरटकर यांचा "मराठा भूषण" पुरस्कार देऊन गौरव !!
सद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज दक्षिणपीठ नाणीज यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान....
कोकण - ( दिपक कारकर )
आपल्या अंगीकृत असंख्य कलागुणांनी गेली २५ वर्षे उत्कृष्ट, बहारदार शाहीरीच्या माध्यमातून रसिक मनाला तृप्त करण्याचे कार्य शाहीर शाहिद खेरटकर करत आले आहेत. त्यांच्या शाहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे जात, धर्म, पंथ, वर्ण यापलीकडे जाऊन मानवतावाद प्रस्थापित करण्यासाठी त्यांची लेखणी सरसावते आणि त्यांच्या पहाडी आवाजातून लोकांचे प्रबोधन होते. शाहिद खेरटकर यांनी कोकणची लोककला जाखडी (शक्ती - तुरा) मनापासून जोपासली आणि तेच रसिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे त्यांचे उत्तम साधन बनले. शाहीर स्वतः एक उत्तम कवी, गायक, वक्ते, निवेदक आणि पत्रकार अशा विविध भूमिकेतून समाजात वावरताना दिसतात. साहित्य क्षेत्रात देखील त्यांनी मजल मारली आहे, त्यांचा प्रकाशित झालेला "ललकारी" हा कविता संग्रह देखील वाचकांच्या पसंतीस उतरला आहे.
कोकणातील ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दखल घेऊन नुकताच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शाहीर शाहिद खेरटकर यांना जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपीठ नाणीज यांच्या शुभहस्ते हस्ते "मराठा भूषण" पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आमदार भास्कर शेठ जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. स्वाती ताई काशिद, राष्ट्रीय कीर्तनकार ह भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाभळे अखिल भारतीय मराठा महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासहित समस्त नागरिक, श्रोतेजण उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठा महासंघ १२५ वर्षे पूर्ण करत आहे, त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अशाप्रकारे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून दोन दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता, यानिमित्ताने बहुजन समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या गुणवंतांचा "मराठा भूषण" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. "मराठा ही जात नव्हे तर एक विचार आहे". या विचारधारेने चालणारे संघटन म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघ होय.
या दोन दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे सूत्रसंचालन देखील शाहीर शाहिद खेरटकर यांनी केले. चिपळूणकर भूमिपुत्र शाहीद खेरटकर यांना प्राप्त झालेल्या पुरस्कार बद्दल त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment