आ. किसन कथोरे यांच्या घरासमोर "प्रहार" चे आंदोलन !
मुरबाड, (प्रतिनिधी) : नैसर्गिक असमतोल, पाण्याच्या नियोजनातील अक्षम्य दुर्लक्ष, बाजारपेठेच्या हेलकाव्यांनी घायकुतीला आलेला शेतकरी प्रखर विपरीत परिस्थितीतून जगत असतानाच "शंभर टक्के कोरा सातबारा" या आपल्या आश्वासनापासून महायुती सरकारने घुमजाव केल्याने किंबहुना किमान पुढील तीन वर्ष कर्जमाफी शक्य नसल्याची स्पष्टोक्ती अर्थमंत्र्यांनी दिल्याने प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी 11 एप्रिलच्या रात्री ठीक 12 वा. राज्यातील सर्वच आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
त्यानुसार, आ. किसन कथोरे यांच्या बदलापुरातील घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एल. पाटील हे आपल्या प्रहारचे पदाधिकारी, स्थानिक शेतकरी व दिव्यांगजणांच्या साथ - संगतीने आंदोलन करणार असल्याचे मुरबाड पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेती उत्पादित मालाला हमी भावाच्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी युतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र सत्तेनंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करत आहे. शिवाय मुरबाडचे आमदार कथोरे यांनी कर्जमाफीबाबत विधानसभेत एक चकार शब्द काढला नाही अथवा स्थानिक पातळीवर त्यासंबंधात दीर्घकालीन उपाय योजनेबाबत प्रयत्न केले नाहीत. याशिवाय दिव्यांग तालुका समन्वय समिती, आमदार निधीतून पाच टक्के दिव्यांग निधी, दिव्यांग भवन, मूकबधिर प्रशिक्षण केंद्र, एमआयडीसीतील दिव्यांग कामगार भरती आदी मागण्या घेऊन तालुकाध्यक्ष एस. एल. पाटील हे प्रस्तुत आंदोलनाद्वारे जाब विचारणार आहेत.
यावेळी, तालुकाध्यक्ष पाटील यांच्यासोबत प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेघना जोशी, तालुकाध्यक्ष किसन भंडारी, मूकबधिर संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र सुरोसे, तालुकाध्यक्ष प्रशांत तेलवणे, सचिव मोहन खुणे, मिलिंद जगताप, यांच्यासह दिव्यांगजन सहभागी होणार आहेत. विश्वासघातकी सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या मनातील असंतोष प्रहार च्या माध्यमातून प्रकट होणार असल्याने या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यानुसार महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने आ. कथोरे यांच्या घरासमोर 11 एप्रिल ला रात्री 12 वा. आंदोलक गळ्यात निळा पट्टा व हातात भगवा झेंडा घेऊन व मशाली पेटवून आंदोलन होणार आहे. दरम्यान, धगधगत्या मशालीच्या ज्वालाने शेतकरी व दिव्यांगजणांच्या समस्या लोकनियुक्त आमदारांना पटतील - समजतील व त्याचा प्रकाश विधानसभेत पडेल, हाच आशावाद आंदोलक व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment