Friday, 13 June 2025

मोहन्यातील लहुजी नगरमधील २,५०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात !!

मोहन्यातील लहुजी नगरमधील २,५०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात !!

* घरघर शौचालय स्मार्ट सिटी स्वच्छ भारत योजना कागदावरच

कल्याण, संदीप शेंडगे - मोहने येथील लहुजी नगर येथील २ हजार ५०० नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उघड्यावर सौच करावयास जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि घर घर शौचालय योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना लहुजी नगरमधील वस्तुस्थितीने चपराक दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत मोहन्यातील लहुजीनगर मधील तब्बल २,५०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आजही कल्याण डोंबिवली सारख्या स्मार्ट शहरात उघड्यावर शौचाला जाण्यास मजबूर आहेत. विशेषतः महिलांना यामुळे होणारी कुचंबणा आणि मानसिक त्रास ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. याबाबत माजी नगरसेवक दया शेट्टी यांनी खासदार सुरेश बाळ मामा म्हात्रे यांची भेट घेतली असून लहुजी नगरच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली आहे. लहुजी नगरच्या अडीच हजार हून अधिक लोकसंख्या असलेल्या विभागामध्ये जर एकही शौचालय नसेल तर नागरिकांनी जायचे कुठे पालिका नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली तीनशे रुपयांची वाढ केली असून त्या पैशाचं पालिका काय करते नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नसणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे असे दया शेट्टी यांनी सांगितले.

*प्रशासनाचे दुर्लक्ष की जाणीवपूर्वक अन्याय?*

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार तक्रारी करूनही याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. स्थानिकांनी यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, आंदोलने केली, तरीही योजनेच्या नावाखाली केवळ आकडेमोड व जाहिरातींचा दिखावा सुरू आहे.

‘घर घर शौचालय’ योजना कुठे गेली?

*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ आणि ‘घर घर शौचालय’** योजनेच्या अनेक उद्घाटन सोहळ्यांनंतर देखील लहुजी नगरमधील वास्तव बदललेले नाही. शौचालये नसल्यामुळे अनेक आजारांनी येथे उगम घेतला असून, लहान मुले वयोवृद्ध नागरिक अनेक आजारांनी त्रस्त झाले आहेत रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिक अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत.

महानगरपालिकेकडून वारंवार “जागेअभावी” किंवा “अधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा” असे कारण सांगितले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांत एकच शौचालय बांधण्यात आले होते तेही तीन वर्षांपूर्वी अचानक कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली होती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करून जातात परंतु या ठिकाणी शौचालय उभारणी करून देत नाहीत असे कल्पना पायाळ यांनी सांगितले.

लहुजी नगरसारख्या ७५ वर्ष जुन्या आणि मागास वस्तीच्या समस्या शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने शौचालयाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा स्थानिकांनी व्यापक रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...