निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळ, सामाजिक मंडळांना आले सुग्गीचे दिवस !
*** गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला मंडळांना मिळणार मोठया प्रमाणात आर्थिक मदत.
*** गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
उरण, दि २४, (विठ्ठल ममताबादे) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात महानगर पालिका, नगर परिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या आधी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव व नवरात्रोत्सव पार पडणार आहे. त्यामुळे उत्सव साजरा करण्यासाठी दारोदारी फिरणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना किमान या वर्षी राजकीय घटकांकडून आर्थिक सहकाऱ्यासाठी फिरावे लागणार नाही. त्यामुळे या वर्षी उत्सव साजरे करणाऱ्या सामाजिक मंडळांना सुगीचे दिवस येणार आहे.यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने अ, ब व क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्या वेळापत्रकानुसार, ११ जूनपासून ते १ सप्टेंबरपर्यंत आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेनुसार प्रसिद्ध करायची आहे. तसेच निवडणुकासंबंधी विविध कार्यक्रम या वेळापत्रकानुसार पार पडायचे आहे. त्यामुळे नवी मुंबई सह इतर महानगरपालिकांची निवडणूक नोव्हेंबरपर्यंत होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे याच कालावधीत गणेशोत्सव, गोपाळकाला, नवरात्रोत्सव व दीपावली हे सण नोव्हेंबर महिन्याच्या अगोदर येत आहेत.नवी मुंबईत तसेच रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव, गोपाळकाला व नवरात्रोत्सव हे उत्सव येथील सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था आयोजित करतात. अशा वेळी त्यांना या कार्यक्रमांच्या वर्गणीसाठी आपापल्या परिसरातील महत्वाच्या व्यक्ती, व्यावसायिक, उद्योजक, विविध पक्षातील राजकीय घटकांकडे देणगी स्वरूपात मदत मागत फिरावे लागायचे. मात्र, आता वर्गणीसाठी दारोदारी फिरणाऱ्या विविध मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकीची आयती संधी चालून आल्याने त्यांची चंगळ होणार असल्याचे मानले जात आहे.
कोट (चौकट ):-
निवडणुकीपूर्वी येणारे सण, उत्सव :-
१६ ऑगस्ट-गोपाळकाला, २७ ऑगस्ट-गणेशोत्सव सुरू, ६. सप्टेंबर-विसर्जन, २२ सप्टेंबर-घटस्थापना, २ ऑक्टोबर-दसरा, १८ ऑक्टोबर-धनत्रयोदशी, २० ऑक्टोबर-नरक चतुर्दशी, २१ ऑक्टोबर-लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबर-बालप्रतिपदा, दीपावली पाडवा, २३ ऑक्टोबर-भाऊबीज
================================================================================
निवडणुकीच्या कालावधीत किंवा त्याच्या आधी इच्छुक राजकीय घटकांकडून विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक उपक्रम,हळदी कुंकू सभारंभ, तीर्थस्थळे, फार्महाऊस पार्ट्या यांना मोठया प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे.आता गणेशोत्सव, गोपाळकाला, नवरात्रोत्सव, दीपावलीनंतर निवडणूक होणार असल्याने गणेशोत्सव मंडळ, गोपाळकाला मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ यांना सुगीचे दिवस आले आहेत यात शंका नाही.
देवेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, उरण
No comments:
Post a Comment