Saturday, 28 June 2025

सरकारी माती चोरी उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी; फेसबुक लाईव्हवर थेट इशारा !!

सरकारी माती चोरी उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी; फेसबुक लाईव्हवर थेट इशारा !!

टिटवाळा, वार्ताहर :
मांडा टिटवाळा वासुन्द्री रोड या होत असलेल्या रस्त्याच्या कामातील  सरकारी माती चोरी प्रकरण बातमीच्या माध्यमातून उघडकीस आणणाऱ्या स्थानिक पत्रकाराला खुलेआम जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. येथील स्थानिक पत्रकार अजय शेलार या पत्रकाराने काही दिवसांपूर्वी सरकारी मालमत्तेच्या गैरव्यवहारावर आधारित एक गंभीर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी प्रशासन स्तरावर सुरु झाली. मात्र, याचा राग मनात धरून संबंधित माफियांनी सोशल मीडियावरून पत्रकाराविरुद्ध आक्षेपार्ह आणि धमकीजनक वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले आहे.

२७ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७:५७ वाजता, संदीप नाईक नामक इसमाने फेसबुक लाईव्हवर येत पत्रकाराचे नाव घेऊन थेट धमकी दिली. “पुन्हा बातमी केलीस तर बघून घेईन,” असा थेट इशारा करत, जर पुढे पुन्हा काही प्रसिद्ध झालं, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्यात आले.

या प्रकरणामुळे पत्रकाराच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, सामाजिक माध्यमांवर त्यांची बदनामी करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधित पत्रकाराने आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संदीप नाईक व त्याचे इतर तीन साथीदार हे स्थानिक माफियांच्या सांगण्यावरून कारवाई करत आहेत.

या घटनेनंतर, पत्रकाराने कल्याण तालुका पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, या धमक्यांमागे कोणते प्रभावशाली माती माफिया आहेत, याचा तपास करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
तक्रारीची प्रत गृह राज्यमंत्री, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण केवळ एका पत्रकाराच्या सुरक्षेचे नसून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होत असलेला हल्ला आहे. पत्रकार संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन !!

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन !! उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्या...