युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवाराची "एक वारी रक्तदानाची" वारीत रक्तदानाची जनजागृती !!
प्रतिनिधी - निलेश कोकमकर
मुंबई - रक्तदान क्षेत्रात कार्यशील असलेल्या युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवाराचे सात समर्पित आणि समाज सेवेसाठी कायम तत्पर असणारे सदस्य रक्तदान जनजागृतीचा बॅनर हातात घेऊन मुंबईहून पंढरपूर वारीला निघाले. वारीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी संपूर्ण मार्गावर "रक्तदान हीच खरी सेवा" हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवले. संध्याकाळी पंढरपूरमध्ये पोहोचताच, तेथील पंढरपूर ब्लड बँकेत आपल्या तीन सदस्यांनी निःस्वार्थपणे रक्तदान करून श्रद्धा, सेवा आणि माणुसकीचा अनोखा संगम साकारला.रक्तदान जनजागृतीचे बॅनर हाती घेऊन भाविकांमध्ये एक वेगळीच जागृती निर्माण करत आहेत.
रक्तदान जनजागृती मोहीम प्रमुख म्हणून श्री. सचिन निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संस्थापक सदस्य रामेश्वर खरूळे, मंदार नायक, हर्ष शिरसाट, सचिन धुरी, किरण पारसेकर, कु. तेजस रामेश्वर खरुळे आदींनी प्रत्यक्ष सहभागी होत हजारो वारकऱ्यांमध्ये रक्तदानाचे महत्त्व प्रभावीपणे पोहोचवले.
वारीस जातो देव भेटी, रक्तदानाने देऊ जीवन भेटी !", "वारीत देव दर्शन, रक्तदानात माणुसकीचे दर्शन !" अशा प्रेरणादायी घोषवाक्यांसह युनिक टीमने हातात फलक, बॅनर्स आणि माहितीपत्रके घेऊन मार्गावर जनजागृती केली. या उपक्रमामुळे अनेक वारकऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी नोंदणीही केली.
यावेळी बोलताना श्री. सचिन निकम म्हणाले, "वारी ही केवळ भक्तीची यात्रा नसून, ती मानवतेच्या सेवेसाठी एक मोठी संधी आहे. लाखो वारकऱ्यांमध्ये रक्तदानाचा संदेश पोहोचवल्यास त्याचा व्यापक आणि सकारात्मक परिणाम होईल."
"युनिक ब्लड मोटिव्हेटर्स" ही संस्था गेल्या 7 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान, थॅलेसेमिया जनजागृती, आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करून समाजसेवेचे कार्य करत आहे.
अशा या मानवतेच्या कार्याला संपूर्ण युनिक परिवाराला वारकरी भाविकांकडून लाख लाख आशीर्वाद मिळाले आहेत.
No comments:
Post a Comment