काही व्यक्ती आपल्या शांत, साध्या आणि निःस्वार्थ कामातून समाजावर अमिट छाप सोडतात. आपल्या कृतींचा गवगवा न करता ते केवळ सेवेशी निष्ठा राखतात. अशाच व्यक्तिमत्त्वाचा नम्र, पण तेजस्वी झळाळणारा दीप म्हणजे कुरूळी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. शांताराम बबन गायकवाड. गोरगरिबांचा खरा आधार शांताराम भाऊंच्या कामाची सुरुवात होते ती शाळकरी मुलांपासून. शिक्षण हा समाज उभारणीचा खरा पाया आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कपडे, वह्या, ड्रेस व दैनंदिन आवश्यक वस्तू ते नियमितपणे पुरवतात. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, केवळ एक ‘कर्तव्य’ म्हणून. त्यांच्या या मदतीमुळे शेकडो गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर झाले आहे. शांताराम भाऊंना वारकरी संप्रदायाची अपार श्रद्धा आणि ओढ आहे. त्यांच्या वडिलांकडूनच मिळालेला हा वसा त्यांनी तन, मन, धनाने जपलेला आहे. दरवर्षी ते पायी वारी करतात, आळंदी ते पंढरपूर ही संतांची वाट त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. केवळ स्वतः वारी करणे इतक्यावर ते थांबत नाहीत. आळंदीतील अनेक वारकरी शाळांना ते नियमित आणि गुप्त स्वरूपात मदत करतात. त्यांच्या देणग्या कोणालाही न सांगता पोचवल्या जातात. हेच त्यांचं खऱ्या अर्थाने नि:स्वार्थ दानधर्म आहे. सद्यस्थितीत त्यांनी एक अत्यंत उपयुक्त आणि संवेदनशील उपक्रम सुरू केला आहे. १९ जुलै २०२५ पासून, भोसरी येथील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेतील सुमारे २५० विद्यार्थ्यांना दररोज सकाळचा नाश्ता (पोहे) देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. या उपक्रमासाठी कोणताही डंका न वाजवता, केवळ मुलांच्या पोषणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. हे फक्त सुरूवात आहे. आगामी काळात या आश्रमशाळेसाठी अधिक भरीव योगदान देण्याचा त्यांचा मनोदय आहे. या उपक्रमामुळे अनेक आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शांताराम गायकवाड हे “अमृतानुभव फाउंडेशन”चे उपाध्यक्ष असून, या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवण्याचे कार्य करीत आहेत. वृद्धांची देखभाल, अनाथ मुलांना मदत, पर्यावरण संवर्धन, आरोग्य शिबिरे इत्यादी अनेक विषयांवर संस्था कार्यरत आहे. तसेच, “गायकवाड प्रतिष्ठान” या स्थानिक संस्थेद्वारे त्यांनी ग्रामीण भागात समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि तरुणांच्या मार्गदर्शनाचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांचा उद्देश एकच समाजाच्या दुर्लक्षित घटकांसाठी आपली शक्ती, वेळ आणि साधनांचा उपयोग करणे. शांताराम गायकवाड हे स्वतः व्यवसायात सक्रिय असूनही आपल्या वेळेचा आणि उत्पन्नाचा एक मोठा भाग समाजसेवेसाठी खर्च करतात. व्यवसाय, कुटुंब, आणि सेवा या तिन्ही गोष्टी त्यांनी समतोलाने सांभाळल्या आहेत. हीच त्यांची खऱ्या अर्थाने संतवृत्ती आहे. दानशीलतेची नोंद नसते, पण परिणाम खोलवर असतो आज जिथं मदतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची स्पर्धा आहे, तिथं शांताराम भाऊ मात्र गुप्त दान करत आपल्या मनाचं समाधान शोधतात. त्यांच्या कृतीत आडमुठेपणा नाही, गर्व नाही, केवळ प्रेम आणि दयाळू मन आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं पैसा सगळ्यांकडे असतो, पण दान करण्याची दानत विरळच असते. आणि अशा दुर्मीळ मनाचे नाव "शांताराम बबन गायकवाड".
संदीप राक्षे✍🏻
भोसरी पुणे२६
No comments:
Post a Comment