Thursday, 23 October 2025

भिवंडी तालुक्यात 'बळी पहाट' मोठया उत्साहात ; सांस्कृतिक कार्यक्रमातून इतिहासाची उजळणी !

भिवंडी तालुक्यात  'बळी पहाट' मोठया उत्साहात ; सांस्कृतिक कार्यक्रमातून इतिहासाची उजळणी !

भिवंडी, प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) :

आपण समाजाचे देणे लागतो. समाजामध्ये वावरत असताना प्रबोधन व परिवर्तन झाले पाहिजे या उद्देशाने शेती संस्कृती, कृषी संस्कृती जपणाऱ्या, शेतकरी-कष्टकरी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा, मनोरंजनातून प्रबोधन घडविणारा व इतिहासाचा वेध घेण्यासाठी ओबीसी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ कलामंच प्रस्तूत मनोरंजनातून प्रबोधन घडविणारा सांस्कृतिक "बळी पहाट" कार्यक्रम २२  ऑक्टोबर २०२५ रोजी भिवंडी तालुक्यातील चौधर पाडा येथे  शेकडो नागरिकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे लेखक दिग्दर्शक, निवेदक प्रमोद जाधव यांनी बोलताना सांगितले की “बळीराजाच्या बाबतीत भाबड कथांवर विश्वास न ठेवता खऱ्या इतिहासाचा शोध घेणे गरजेचे आहे.” तुकोबारायांच्या अभंगांचा दाखला देत त्यांनी बळीराजाच्या स्मृतींना उजाळा दिला. सादरीकरणातून शेतकरी वर्गाचे दुःख व संघर्ष, “बळीचे राज्य” येण्याची लोकांची आस, तसेच शिवराय–संभाजी महाराज, जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई, रमाई, राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याचे स्मरण, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्य– न्याय– समता– बंधुभावाच्या मूल्यांचा जागर करण्यात आला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच ओबीसी समाजाने आपले अधिकार संघटितपणे मागणे आवश्यक आहे, हा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमातून ओबीसी जनजागृती हा मुख्य विषय मांडण्यात आला. ओबीसींचे आरक्षण कशाप्रकारे संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर जातनिहाय जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करत, सामाजिक न्याय आणि हक्कांच्या लढ्यासाठी ती किती आवश्यक आहे हे प्रभावीपणे मांडण्यात आले.

गेल्या दहा वर्षांपासून ओबीसी संघर्ष समिती रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर लढा देत आहे. समाजाला त्यांच्या संविधानिक हक्कांची जाणीव करून देण्यासाठी, शिक्षण–आरक्षण–राजकीय प्रतिनिधित्व या विषयांवर सतत जनजागृती करत आहे. “बळी पहाट” हा त्याच चळवळीचा एक विस्तार ठरला.

“बळी पहाट” या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन आणि निवेदन प्रमोद जाधव यांनी केले. निवेदक राजेंद्र पाटील, साधना भेरे, ज्योती दवणे, नीलम भोईर , साक्षी वाघेरे यांच्या प्रभावी सादरीकरणाने कार्यक्रम रंगला, तर गायक अरुण गगे, दिनेश भोईर, संतोषी जाधव आणि रुपाली जाधव यांच्या मधुर आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. राजमाता जिजाऊ कलामंचच्या नृत्यकलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

“बळी पहाट” हा केवळ मनोरंजन करणारा नव्हे, तर शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या संस्कृतीचा तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांचा वास्तवदर्शी दस्तऐवज ठरला. उत्कृष्ट नियोजन, विचारपूर्वक संहिता, प्रभावी सादरीकरण आणि सामाजिक आशय यामुळे हा सांस्कृतिक आविष्कार प्रेक्षकांच्या कमालीच्या पसंतीस उतरला.

 कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी जयवंत पाटील, कुंडलिक पाटील, पंडित पाटील, योगेश पाटील, विनोद भोईर, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, संदीप वाघेरे, अजय किरपण, शाम पाटील, रुपेश मांजे, दत्ता दवणे, तुषार शेलार आदी कार्यकर्त्यांनी  मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...