रायगड तोफ दिवाळी अंकाचे उद्योजक नितीन पाटील यांच्या हस्ते प्रकाशन !!
उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातून प्रकाशित होणारा “रायगड तोफ” हा दिवाळी अंक यावर्षीही प्रकाशित झाला. या अंकाचे प्रकाशन नामांकित उद्योजक नितीन पाटील यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात पार पडले.
प्रकाशन सोहळ्यावेळी घारापुरीचे उपसरपंच बळीराम ठाकूर, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम दामोदर कडू, सेवानिवृत्त शिक्षक रा. ऊ. म्हात्रे, मुख्य कार्यवाहक शशिकांत म्हात्रे, रवींद्र म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून “रायगड तोफ” हा दिवाळी अंक स्थानिक पत्रकारिता, सामाजिक भान आणि सांस्कृतिक लेखन यांचा संगम साधत आला आहे. या अंकातून रायगड जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर भाष्य करण्यात येत असून, स्थानिक लेखक व पत्रकारांना आपला आवाज मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळते.
प्रकाशनावेळी उद्योगपती नितीन पाटील यांनी सांगितले की, “रायगड तोफ हा फक्त दिवाळी अंक नसून, रायगडच्या जनतेचा आवाज आहे. स्थानिक पत्रकार व लेखकांनी असे उपक्रम सुरू ठेवावेत, हीच खरी समाजसेवा आहे.”
समारोपावेळी उपस्थित मान्यवरांनी संपादकमंडळाचे अभिनंदन करून भविष्यात हा अंक आणखी प्रभावी स्वरूपात वाचकांसमोर यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
No comments:
Post a Comment