'लोकधारा प्रतिष्ठान' ट्रस्टतर्फे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा !!
संविधानातील मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख; पोस्टरच्या माध्यमातून संदेश देत जनजागृती
भिवंडी, प्रतिनिधी :
भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या “घर-घर संविधान” या उपक्रमाचे पालन करत ‘लोकधारा प्रतिष्ठान’ ट्रस्ट तर्फे समतानगर, पडघा येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन एकत्रितपणे केले.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचे आकर्षक पोस्टर सादर करण्यात आले. पोस्टर प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी संविधानातील मूळ तत्त्वांचा सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडला.
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्ये रुजणे अत्यंत गरजेचे आहे. संविधानामुळेच आपण सुरक्षित आहोत; प्रत्येकाने संविधान वाचण्याची आणि समजून घेण्याची सवय लावावी. असे मत लोकधारा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी व्यक्त केले. त्यांनी कवितेद्वारेही संविधान जनजागृती केली. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका विद्या जाधव, सोनाली जाधव, मदतनीस सीमा जाधव, सर्पमित्र सुरज गायसमुद्रे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक,पालक , मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकधारा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, संविधान जागृतीसाठी हा उपक्रम परिणामकारक ठरला आहे.
वृत्त सौजन्य - मिलिंद जाधव (कवी/पत्रकार)
No comments:
Post a Comment