तिसरी मुंबई : विकास की विनाश ?
** भूमिपुत्रांनो, आपल्या अस्तित्वाचा विचार करा ; सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांचे स्थानिक भूमीपुत्रांना अस्तित्वासाठी एकत्र येण्याचे आवाहन
उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : सध्या 'तिसरी मुंबई म्हणजेच' मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे विकसित केले जाणारे एक नवीन नियोजित शहर , ज्याला अधिकृतपणे 'कर्नाळा-साई-चिरनेर' (KSC) न्यू टाऊन असे नाव देण्यात आले आहे, याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. चकाचक रस्ते, टोलेजंग इमारती आणि स्मार्ट सिटीच्या स्वप्नांनी सामान्य माणसाचे डोळे दिपवले जात आहेत. परंतु, या विकासाच्या झगमगाटामागे उरण, पनवेल आणि पेणच्या सुपीक मातीत राबणाऱ्या आगरी, कोळी, कऱ्हाडी आणि आदिवासी बांधवांचे भविष्य अंधारात ढकलले जात नाही ना ? हा प्रश्न आज ऐरणीवर आला आहे.त्यामुळे सर्वकाही मतभेद विसरून तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचे आवाहन उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी केले आहे.
तिसरी मुंबई म्हणून निर्मिती होणाऱ्या या भागातील शेती हि केवळ जमीन नाही, तर पिढ्यांची उपजीविका आहे. ज्या जमिनीवर आपल्या पूर्वजांनी घाम गाळला, जिथे पिढ्यांनपिढ्या भात पिकविला, ती जमीन आज 'रिअल इस्टेट'च्या नावाखाली गिळंकृत केली जात आहे. शेती ही 'अन्नदाती' आहे. जमिनीतून मिळणारे उत्पन्न शाश्वत आहे, पण जमिनीच्या बदल्यात मिळालेला पैसा महागाईच्या काळात फार काळ टिकणार नाही. एकदा का हातातून जमीन गेली, की पुढच्या पिढ्यांसाठी उत्पन्नाचे हक्काचे साधन कायमचे नष्ट होईल.
आजवर जपत आलेली संस्कृती आणि गावपण सिमेंटच्या जंगलात कधी हरवून जाईल, हे कळणार सुद्धा नाही. आपली आगरी-कोळी संस्कृती, गावदेवीच्या जत्रा, पालखी सोहळे, पारंपरिक उत्सव आणि एकमेकांवरील जिव्हाळा हा आपल्या गावांचा प्राण आहे. शहरीकरणामुळे गावेच नष्ट होतील आणि माणसे फ्लॅट संस्कृतीच्या खोल्यांमध्ये बंदिस्त होतील. आपला पेहराव, आपली खास बोलीभाषा आणि आपली सामूहिक शक्ती, सामाजिक ओळख या सिमेंटच्या जंगलात कायमची पुसली जाईल.
आजकाल बातम्यांच्या माध्यमातून शहरीकरणांचे भयंकर कटू वास्तव आपण रोजच पहात आहेत, मुंबई आणि इतर शहरांच्या बातम्या वाचल्या की अंगावर काटा येतो. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणारी माणसे आणि वाढती गुन्हेगारी. ज्या भागाची जाणीव नसलेले लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतील, तेव्हा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होईल. महिलांवरील अत्याचार, अपहरण, आर्थिक फसवणूक आणि अमली पदार्थांचा विळखा या समस्या शहरीकरणासोबतच येतील. आपला शांत गावकुसाचा परिसर या प्रदूषणात आणि गुन्हेगारीत भरडला जाईल.
सध्या शेती कष्टाची वाटत असली तरी, शेतकरी कायम मालक म्हणूनच शेतीची मशागत करत होता. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ज्या जमिनीचा आज शेतकरी 'मालक' आहे, उद्या तोच शेतकरी त्याच जमिनीवर उभ्या राहणाऱ्या इमारतीचा 'वॉचमन' किंवा 'सफाई कामगार' तर होणार नाही ना ? आपल्या नवीन पिढीकडे जर तांत्रिक शिक्षण नसेल, तर त्यांना या हाय-टेक शहरात नोकऱ्या मिळणार नाहीत. मग आपल्या मुलांना रोजगारासाठी वणवण करावी लागेल. हे चित्र आजवर ज्यांनी जमिनी देऊन त्यावर प्रकल्प किंवा व्यवसाय उभे राहिले आहेत, त्यात आपण दररोज पाहत आहोत.
हा प्रश्न फक्त जमिनीचा आणि उपजीविकेचाच नसून येथील निसर्गाचा आणि पर्यावरण पूरक जीवनशैलीचाही आहे . सुपीक भातशेती, नैसर्गिक नाले आणि डोंगर बुजवून जेव्हा काँक्रीटचे जंगल उभे राहील, तेव्हा निसर्गाचा कोप अटळ आहे.पावसाळ्यातील पूर, वाढते तापमान आणि अशुद्ध हवा यामुळे आपल्या आरोग्याचे बारा वाजतील. नैसर्गिक अन्नाऐवजी भेसळयुक्त शहरावर अवलंबून राहवे लागेल. म्हणजेच उपजीविका तर जाईल आणि आरोग्याचे प्रश्नही उद्भवतील.
विकास हवा, पण तो भूमिपुत्रांना विस्थापित करणारा नसावा. आपली सुपीक जमीन ही आपली जीवनदायीनी आहे. त्यामुळे येथील शेतीकडे आजचा आधार आणि पुढील पिढीचे भविष्य म्हणून पाहिले पाहिजे. आज आपण एक झालो नाही, तर उद्या आपली येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. तिसऱ्या मुंबईच्या विचारांच्या झगमगाटामागे उध्वस्त गावांचा अंधार डोळे उघडून पहायला हवा. नाहीतर पश्चातापच होईल.
अजूनही वेळ गेलेली नाही. जागे होवू या, नाहीतर आपण आपल्याच मातीत उपरे ठरू असे मत उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी व्यक्त केले आहे. सर्व नागरिकांनी, तरुणांनी कोणत्याही लोभ, प्रलोभने, अमिषाला बळी न पडता आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment