गौरवपूर्ण वृद्धावस्थेकडे वाटचाल : पनवेलमध्ये ‘संगम’ कार्यक्रम संपन्न !
उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे)
प्रजापिता ब्रह्माकुमारीज माऊंट आबू तर्फे तसेच समाज सेवा प्रभाग (RERF) यांच्या सहकार्याने पनवेल ब्रह्माकुमारीजतर्फे ‘संगम – गौरवपूर्ण वृद्धावस्था एवं सन्मानित जीवन’ हा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक सभेच्या उपाध्यक्ष श्रीमती माधुरी गोसावी, सचिव सुनील खेडेकर तसेच पनवेल ब्रह्माकुमारीजच्या मुख्य संचालिका राजयोगिनी बीके तारा दीदी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बीके डॉ. सचिन परब उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. सचिन परब यांचे ज्येष्ठ नागरिक सभेतर्फे व पनवेल ब्रह्माकुमारीजतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. सचिन परब यांनी ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत मोलाचे विचार दिले. “उबुन्टु” या संकल्पनेद्वारे “आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहणे आवश्यक आहे” हा संदेश त्यांनी प्रभावीपणे मांडला. आजच्या काळात अनेक वृद्धांना वृद्धाश्रमात राहावे लागते याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत, एकटेपणा टाळण्यासाठी एकमेकांशी संवाद साधा, भावना व्यक्त करा आणि मन मोकळे ठेवा, असे आवाहन केले.
ज्येष्ठ नागरिक सभेचे १००० हून अधिक सभासद असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन करत, त्यामुळे एकटेपणाची भावना कमी होण्यास मदत होईल असे नमूद केले. तसेच या वयात भावनिक गुंतवणूक कमी ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला, कारण त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख कमी होते.
मनात काहीही दडवून न ठेवता व्यक्त होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी “मनात गाठी तयार करू नका” हा संदेश दिला. यावेळी त्यांनी उपस्थितांना हात उंच करून मूठ घट्ट बंद करून नंतर हळूहळू सैल सोडण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले आणि मूठ सैल सोडल्यावर कसे हलके वाटते हे त्यांनी समजावून सांगितले.
विज्ञानानेही हे मान्य केले आहे की मनातील ताणतणावाचा शरीरावर परिणाम होतो, असे सांगत त्यांनी हृदयविकार आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचावासाठी सकारात्मक विचार आणि मोकळेपण आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच वाढत्या वयात खळखळून हसणे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. वयोमानानुसार स्मरणशक्ती घटण्याच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी नियमित राजयोग मेडिटेशन करण्याचा सल्ला दिला.
मृत्यूबद्दलचे भय कमी करण्यासाठी त्यांनी आत्म्याबद्दल मार्गदर्शन करत “आपण शरीर नसून आत्मा आहोत” हा आध्यात्मिक दृष्टिकोन स्पष्ट केला. आत्मा अमर असून एक शरीर सोडून दुसरे धारण करतो, हा आत्म्याचा प्रवास आहे, असे त्यांनी सांगितले. ध्यान (Meditation) करून घेतल्यानंतर उपस्थितांनी शांत, हलके आणि आनंदी वाटल्याची भावना व्यक्त केली.
यानंतर राजयोगिनी बीके तारा दीदी यांनी एकटेपणा दूर करण्यासाठी परमपिता परमात्म्याशी नाते जोडण्याचे महत्त्व सांगितले. त्याच्याशी विविध नात्यांनी जोडल्यास जीवनात खरे सुख, शांती आणि आनंद मिळतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच राजयोग मेडिटेशन कोर्स करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजयोगिनी बीके शकुंतला दीदी यांनी सुरेखरीत्या केले. शेवटी उपाध्यक्ष माधुरी गोसावी व सचिव सुनील खेडेकर यांनी प्रमुख पाहुणे व आयोजकांचे आभार मानले.
पनवेल ब्रह्माकुमारीजतर्फे सर्व ज्येष्ठ नागरिकांचा टिळा लावून सन्मान करण्यात आला तसेच ‘ब्लेसिंग कार्ड’ देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना चहा व बिस्किटे देण्यात आली.
हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ सन्मानाचा नव्हे, तर मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करणारा ठरला. उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण करून आनंदी, निरोगी आणि सन्मानित जीवन जगण्याचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला
No comments:
Post a Comment