Wednesday, 8 April 2026

जिजाऊंचे विचार महिलांनी अंगिकारून स्वाभिमानी परिवार व समाज घडवावा - केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

जिजाऊंचे विचार महिलांनी अंगिकारून स्वाभिमानी परिवार व समाज घडवावा - केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

* कुर्मी महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन जबलपूर येथे उत्साहात संपन्न
* विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान

जिजाऊंचे विचार महिलांनी अंगिकारून स्वाभिमानी परिवार व समाज घडवावा तसेच शिवाजी महाराजांचा व सरदार पटेल यांचे बुलंद विचार कुर्मी समाजाला सक्षम बनवतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी केले आहे.

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन व महिला राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच मध्यप्रदेशातील जबलपूरमधील दाऊ मॅरेज गार्डन, महाराजपूर येथे पार पडले. यावेळी बोलताना अनुप्रिया पटेल यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा यांसह व्यसनाधिनता दूर झाली पाहिजे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. तर समाजातील महिला सक्षम व स्वयंपूर्ण झाली तरच समाज सक्षम व स्वाभिमानी बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी देशभरातून प्रत्येक राज्यातील समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या अधिवेशनासाठी मंत्री आशिष पटेल, दशरथ पटेल, रामखिलावन पटेल, खासदार लता वानखेडे, ज्ञानेश्वर पाटील, राकेश सिंह यांसह कुर्मी महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल.पी.पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.निरंजन प्रसाद, महासचिव उमेशकुमार पटेल, महिला अध्यक्षा लताऋषी चंद्राकर, युवा अध्यक्ष धीरज पाटीदार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

देशातील विविध राज्यांतील प्रांतीय पदाधिकारी आपल्या जिल्हाध्यक्षांसह सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, महासचिव जयेश शेलार पाटील, कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील, युवा अध्यक्ष प्रमोद ठोंबे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. शोभाताई गायकवाड,  उद्योग प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष समीर पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्रातील पुरोहित प्रशिक्षक व पुरोहित प्रकोष्ठ कोकण प्रांताध्यक्ष विजय दलवी, कुर्मी पुरोहित डॉ. संदीप वरकुटे, संतोष भुसारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.‌ तर या अधिवेशनात महाराष्ट्र कुर्मी समाजाचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ. बाबूलाल सिंह यांच्या स्मरणार्थ समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे अजित राऊत (बोईसर) यांना जीवनगौरव,  तुकाराम पष्टे (विरार) यांना वैद्यकीय सेवा रत्न, हरिदास आखरे (बुलढाणा) यांना विश्वभूषण संत तुकाराम महाराज पुरस्कार, प्रमोद ठोंबे (पुणे) यांना छ.संभाजी महाराज युवा रत्न, ॲड.गोपाल शेळके (रायगड) यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार, निवृत्ती न्याहारकर (नाशिक) यांना कृषी रत्न, संजय गायकवाड (नाशिक) यांना शिक्षण रत्न, दिनेश दळवी (रत्नागिरी) यांना कृषी रत्न, विजय राव (टिटवाळा) यांना उद्योग रत्न, शाहीर उत्तम गायकर (इगतपुरी) यांना सांस्कृतिक कला रत्न तर संदीप काळे (नाशिक) यांना प्रशासकीय रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या महाअधिवेशनात देशभरातील कुर्मितील  विविध समाजांचा सहभाग होता. यामध्ये पटेल, पाटीदार, मराठा, कुनबी, कलबी, कुडुंबर, कूर्मि, देवेंद्र कुल वेल्लालर, महतो, गुर्जर, खंडायत, नायक, नायडू, कापू, चंद्राकार, अंजना समाज, कम्मा, ओक्का लिंगा, कुलमी आदी विविध समाजांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय !

नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय !  'देरे हरी खाटल्यावरी' हे चालणार नाही : महेंद्रशेठ घरत...