Monday 27 April 2020

उल्हासनगर शहरवासीयांसाठी पालिका आयुक्तसुधाकर देशमुख यांची धोक्याची सूचना

उल्हासनगर शहरवासीयांसाठी पालिका आयुक्त
सुधाकर देशमुख यांची धोक्याची सूचना
            
उल्हासनगर  - सिध्दांत गाडे
उल्हासनगर-५ येथे यापूर्वी अत्यंत गर्दीच्या भागात एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. आज उल्हासनगर शहरात मिळालेला जिजामाता कॉलनी, संभाजी चौकातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ही शहराची चिंता वाढवणारी बाब आहे. असे उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

पुढे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे की अत्यंत गर्दीच्या शहरात गर्दी करण्याचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी शिक्षा करूनही शिस्त मोडणार यांचे प्रमाणही वाढले आहे.  जिजामाता कॉलनी जवळचा मोठ्या प्रमाणात भाग हा झोपडपट्टी किंवा गर्दीच्या चाळींचा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रोगाचा फैलाव झाल्यास कुणीही नियंत्रणात आणू शकणार नाही. असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

मुंबई शहरात या रोगाने फैलावत गती पकडली असून दर ६.६ दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. ठाणे व मीरा-भाईंदर येथील प्रसार सुद्धा अत्यंत चिंताजनक आहे. थोडक्यात या आजाराने अक्राळ विक्राळ रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरास साथ रोगमुक्त ठेवणे हे प्रशासनाच्या हातात राहिले नसून शिस्त पाळणाऱ्या नागरिकांच्या हातात आहे. मुंबई व उपनगर क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे त्या क्षेत्रात राहणारे उल्हासनगर शहरातील रहिवासी किंवा उल्हासनगर येथील रहिवाशांचे नातेवाईक छुप्या पद्धतीने शहरात प्रवेश करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. असेही पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

अनेक वेळा आवाहन करूनही नागरिकांना नातेवाईकाकडे जाऊ नये व नातेवाईकाला बोलावू नये असे सांगूनही त्याचे पालन केले जात नाही. या बाबी पोलिसांच्या नियंत्रणाच्या पलीकडे आहेत.

खेड्यापाड्यांमध्ये नागरिकांनी पूर्ण शिस्त पाळली असून राज्यात खेड्यांमध्ये हा आजार पोहोचला नाही. मात्र नोकर-चाकर, मालक व चालक वर्ग असलेल्या सुशिक्षित लोकांच्या शहरांमध्ये दुर्दैवाने शिस्त पाळण्यामध्ये शहरे कमी पडत आहेत.

शहरातील अत्यावश्यक सेवांचे दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांना अनेक नियम घालून दिलेले आहेत. प्रशासन नियम पाळण्यासाठी दबाव आणत आहे. मात्र दुकानदार किंवा ग्राहक या दोघांनाही शिस्तीबद्दल गांभीर्य नाही. सर्वच बाबी केवळ प्रशासनाने थांबविणे कधीही शक्य नसते. लोक शिस्त पाळत नाहीत म्हणून तक्रारी केल्या जातात मात्र शिस्त पाळत नाही हे पाहणाऱ्यांचे व तक्रारी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त वाढत असून शिष्ट स्वतःहून पाळणार यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मुळातच मर्यादित असलेले पोलीस व प्रशासकीय कर्मचारी यांचा ताण वाढत असून रोग नियंत्रणावर काम करण्यापेक्षा तक्रारी निवारण करण्यातच वेळ जास्त जातो. असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

शहरवासीयांच्या हातून अद्याप वेळ गेलेली नाही. मनाला आवर घालणं व आपल्या भागातील लोकांना शिस्तीत ठेवणे हे अजून आपण करू शकतो. आपण किमान २० मे पर्यंत रोग नियंत्रणात ठेवला तरच हे शहर वाचू शकते. अन्यथा या शहराला कोण वाचवेल हे सांगणे कठीण आहे. राज्यातील एका महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याने तेथील आयुक्तांसह इतर कर्मचाऱ्यांना quarantine करण्यात आलेले आहे. अनेक शहरांमध्ये डॉक्टर व नर्सेस कोरोना रोगाची रुग्ण बनत आहे. त्यामुळे ही यंत्रणा किती दिवस कार्यरत राहू शकते याची शाश्वती देणे अत्यंत कठीण आहे.

यासंदर्भात पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे की मी खूप चिंतीत आहे. प्रशासन आता सर्व उपाययोजना करून जनतेच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. मात्र जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विनाश अटळ आहे. आताच मनाला आवर घाला अन्यथा जे वाचतील ते केवळ कुणाच्यातरी डोक्यावर दोषाचे खापर फोडण्याचे काम करतील. असे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...