अनुपस्थित कर्मचा-यांना तातडीने कामावर हजर होण्याचे अंतिम आवाहन.
वारंवार आवाहन करुनही अनुपस्थित राहणा-यांवर होणार बडतर्फीची कारवाई.
बडतर्फीनंतर रिक्त झालेल्या पदांसह इतर रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचारी नेमणार.
मुंबई, प्रतिनिधी
‘कोरोना कोविड – १९’ या संसर्गजन्य आजाराची बाधा झालेल्या रुग्णांसह इतर रुग्णांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार वेळच्यावेळी मिळणे गरजेचे आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ४ प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने इत्यादींमार्फत मुंबईकरांना अव्याहतपणे वैद्यकीय सेवा-सुविधा देण्यात येत आहेत. तथापि, काही ठिकाणी वर्ग – ३ व वर्ग – ४ चे काही कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कर्मचा-यांनी देशहिताच्या दृष्टीने आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्या कर्तव्यावर हजर राहण्याचे आवाहन यापूर्वीही महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी वारंवार अनुपस्थित राहणा-या कर्मचा-यांना एक शेवटची संधी दिली असून आपल्या कर्तव्यावर हजर न होणा-या कर्मचा-यांना साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती नियंत्रण कायद्यानुसार ७२ तासांची अंतिम नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरही कर्तव्यावर रुजू न होणा-या कर्मचा-यांना बडतर्फ (Dismiss) करुन त्यांच्याजागी तातडीने कंत्राटी स्वरुपात नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका विशेष बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीला प्रधान सचिव व महापालिकेच्या विशेष कार्याधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, सर्व संबंधित ज्येष्ठ डॉक्टर, संबंधित सह आयुक्त / उप आयुक्त, महापालिकेच्या रुग्णालयांचे अधिष्ठाता, विभाग स्तरिय सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत रुग्णालयातील मनुष्यबळ व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा झाली. सध्या रुग्णालयातील अनेक कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत आहेत. यामुळे रुग्णालयात कर्तव्यावर उपस्थित राहत असलेल्या डॉक्टर – नर्स - वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. परिणामी रुग्णालयाचे सुयोग्य व परिपूर्ण व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस कठीण होण्यासह वैद्यकीय सेवा-सुविधांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही बाबी लक्षात घेता अनुपस्थित असणा-या कर्मचा-यांनी तात्काळ कामावर हजर होणे गरजेचे व आवश्यक आहे.
वरीलनुसार संबंधित कर्मचा-यांना महापालिका प्रशासनाद्वारे यापूर्वी अनेकदा कर्तव्यावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या सेवा नियमावलीनुसार उपस्थित राहण्याचे आदेश देखील वेळोवेळी देण्यात आले आहेत. मात्र, तरीही अनेक कर्मचारी अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान या कर्मचा-यांना शेवटची संधी म्हणून ७२ तासांची अंतिम नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. ही नोटीस साथरोग कायद्यानुसार व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार देण्यात येणार आहे. तसेच ज्या कर्मचा-यांचे वय ५५ वर्षे किंवा अधिक आहे आणि ज्यांना काही आजार आहे, त्यांना ‘नॉन कोविड’ कामे दिली जातील, असेही सदर नोटीशीत नमूद करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
उपरोक्त तपशीलानुसार ७२ तासांची नोटीस देऊन देखील जे कर्मचारी हजर होणार नाहीत, त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे व त्यांच्या जागी कंत्राटी तत्वावर नवीन कर्मचा-यांची नियुक्ती करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच मंजूर पदांपैकी जी पदे रिक्त आहेत, ती पदेदेखील कंत्राटी तत्वावर भरण्याचे निर्देशही महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी दिले आहेत. यानुसार बडतर्फीमुळे रिक्त झालेल्या आणि आधीपासून रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका
०४/०५/२०२०
No comments:
Post a Comment