Sunday 28 June 2020

पावसाने दडी मारल्याने माणगांव तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त !! 'शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट"

पावसाने दडी मारल्याने माणगांव तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त !!
'शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट"
     
 
       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ०३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळासह पावसाने हाहाकार केल्यानंतर गेली दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्व शेतकरी चिंताग्रस्त झालेले दिसून येत आहेत. 
  कारण माणगांव तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी रोहीणी नक्षत्राच्या प्ररंभापासून भात, नागली तथा नाचणी, वरी, झेंडू, उडीद, मिरची, कारली, भेंडी, गवार, चवळी, काकडी  आदि पिकांची धूळ वाफेची पेरणी केली. माणगांव तालुक्यात सुरवातीला पाऊस समाधानकारक पडल्याने शेतकर्यांनी पेरलेल्या भाताच्या प्रमुख बियाण्यासह सर्व प्रकारच्या बियाण्याचा चांगल्या प्रकारे रूज होवून रोपांची वाढ उत्तम झाली आहे. मात्र मागील दोन हप्त्यांपासून पावसाने दडी मारल्याने माणगांव तालुक्यातील शेतकर्यांची भात पिकाची लावणी खोळंबली आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील शेतकरी हवालदिल होऊन चिंताग्रस्त झाला आहे.         
      कोरोना विषाणू आणि निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कंबरडे मोडलेल्या माणगांव तालुक्यातील शेतकरी मागील चार ते पाच वर्षापासून लहरी हवामान बेमोसमी पावसाच्या तर कधी दुष्काळाच्या मार्यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. 
        कोरोनाच्या महामारीमुळे सर्व शेतकऱ्यांचे गणित पुरते बिघडले आहे. शेतकरी शेतात अहोरात्र राबून, महागडे बियाणे विकत घेऊन त्याला महागडी खते वापरून अनेक मजूर घेऊन  मोठ्या कष्टाने तयार केलेल्या शेतीमालाला बाजारात कवडीमोल दराने विकावा लागतो. त्यामुळे शेतकर्यांना प्रचंड नुकसान पत्करावे लागते. 
       या सर्व बाबींवर मात करून माणगांव तालुक्यातील शेतकर्यांनी यंदा नव्या जोमाने खरीप हंगामाची तयारी केली आहे .परंतु पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त  झाला आहे. कारण शेतकर्यांनी पेरणी केलेले बियाणे सध्याच्या परिस्थितीत चांगले उगवून ही रोपे उगवून वर आली आहेत. कसदार जमिनीतील,पिके चांगली तरारली आहेत तर हलक्या क्षेत्रातील पिकांना पावसाची गरज आहे या आठवड्यात पाऊस न झाल्यास ही पिके माना टाकण्याची स्थितीत आहेत त्यामुळे पुन्हा पेरणी करणे शेतकऱ्यांना परवडनारे नाही. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
       माणगांव तालुक्यात सद्या  दिवसभर ढगाळ वातावरण तर कधी भर पावसाळ्यात रखरखीत उन पडते. तर कधी कधी  पावसाची शक्यता वाटते मात्र पाऊस येत नाही .पाऊस झालाच तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात पडतो  त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाची आशेने वाट पाहत आहेत. सध्या शेतकरी खुरपणी कोळपणी मशागतीचे काम करीत आहेत. भाताच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. परंतु पाऊस पडत नसल्याने दुबार पेरणीच्या संकटामुळे माणगांव तालुक्यातील शेतकरी हवालदिल होऊन चिंताग्रस्त झाला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...