26 जुलै च्या महापुराच्या केवळ आठवणीने मनात धडकी, बारवी डॅम परिसरात केवळ पंचवीस टक्के पाऊस!
कल्याण (संजय कांबळे) २६/२७ जुलै २००५ मध्ये अचानक झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे आणि त्यानंतर आलेल्या महापूरात अतोनात जीवीत व वित्त हानी झाली होती. त्या वेळच्या केवळ आठवणीने आजही मनात धडकी भरते. २६/२७ जुलै ही तारीख जवळ आली की एकप्रकारे मनाला हुरहुर लागते. परंतु सध्याच्या परिस्थितीत मोकळे आकाश पाहिले तर यावेळी असे काही होईल असे वाटत नाही. कारण नद्यांना कायमस्वरूपी जिंवत ठेवणारा बारवी डॅम परिसरात केवळ २५ टक्के पाऊस झाला असून तो फक्त ४७ टक्के भरला आहे.
सन २००५ मधील २६/२७ जुलै हे दोन दिवस कल्याण तालुक्यातील कोणीही विसरु शकत नाही. या दिवशी तसा दिवसभर पाऊस सुरू होता. उल्हास नदीला पूर येणार हे जवळपास सर्वांना माहित होतं. परंतु महापुर येईल असे कोणालाच वाटले नव्हते. दिवसरात्र पडलेला पाऊस आणि याच काळात समुद्रात असलेली भरती यामुळे उल्हास बारवी, काळू आणि भातसा नदिच्या काठावरील गावात रात्री 1ते2च्या दरम्यान पाणी घुसल्याने जो तो जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढायचा प्रयत्न करत होता. रायते वरप, आणे भिसोळ मोहिली या गावातील हजारो लोकांनी टेकड्या /डोंगराचा आधार घेतला. उघड्या डोळ्यांसमोरून संसार वाहत जाताना पाहून अनेकांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. कित्येकांचे जीव गेले, घरे, गुरे ढोरे वाहून गेले ऐवढेच काय तर शेती देखील वाहून गेली होती. दु:खाचा डोंगर कसाबसा सावरत असतानाच अचानक डॅम फुटला अशी अफवा आली आणि पुन्हा लोकांनी डोंगर जवळ केले. त्यामुळे लहान मुलांनी तर या महापुराचा धसकाच घेतला होता. म्हणून हा दिवस कोणीही विसरु शकत नाही. आजही या आठवणी ताज्या होतात.
परंतु आता उद्या २६ जुलै आहे आणि अद्याप पाऊस नाही त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. परंतु पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. मागील वर्षी ५आॅगस्ट २०१९ रोजी बारवी डॅम शंभर टक्के भरुन ओव्हरपोलो झाला होता. नदी दुथडी भरून वाहत होते. पण आता डॅम मध्ये केवळ ४७/४८ टक्के स्टोअर केलेले पाणी आहे. बारवी डॅम ची पाणी साठवण क्षमता ३४८ एम एम सी इतकी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या परिसरात चांगला पाऊस झाला तर डॅम शंभर टक्के भरेल. तसेच मागील वर्षी याच कालावधीत या परिसरात ५० टक्के पाऊस झाला होता. आता तो २५ टक्केच झाला आहे असे बारवी डॅम चे अधिकारी जनार्दन कुंभारे यांनी सांगितले. तसेच लाॅकडाऊण मुळे पाण्याचा कमी वापर झाला असून ते पाणी स्टोअर केले आहे. त्यामुळे भविष्यात फारशी पाणी टंचाई निर्माण होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


No comments:
Post a Comment