Monday 27 July 2020

कल्याण पंचायत की दुरुस्तीची पंचायत, नवीन इमारत नाहीच, केवळ दुरुस्ती पे दुरुस्ती ?

कल्याण पंचायत की दुरुस्तीची पंचायत, नवीन इमारत नाहीच, केवळ दुरुस्ती पे दुरुस्ती ?


कल्याण (संजय कांबळे) : तालुक्याचे विकास केंद्र म्हणून ओळखले जाणा-या कल्याण पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न काय कोणत्याही सभापतीच्या कार्यकाळात सुटेल असे वाटत नाही. कारण केवळ दुरुस्ती च्या नावाखाली सडलेल्या लोंखडाला मुलामा देण्याचे काम सध्या सुरू असून आतापर्यंत कित्येक दुरुस्त्या झाल्या पण प्लास्टर पडायचे काय थांबले नाही त्यामुळे ही लोकांची पंचायत आहे की ठेकेदारासाठी "पंचायत" हेच कळेनासे झाले आहे.


तालुका पंचायत समिती ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातील दुवा मानली जाते. कल्याण पंचायत समितीच्या जुन्या इमारतीची मुदत केव्हाच संपलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केलेली आहे. त्यामुळे चार पाच वर्षांपूर्वी ती रिकामी करण्यात आली आहे. परंतू तिला लागून असलेली इमारत देखील धोकादायक आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण या इमारतीच्या प्लेअरला तडे गेले आहेत.. याला लोखंडी खांबाचे "टेकू" लावले आहेत. सभागृहात, व्हरांड्यात, जिना, कृषी विभागात अनेक वेळा प्लास्टर पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
दहा ते पंधरा विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी तसेच लोक कल्याण पंचायत समितीच्या कार्यालयात ये जा करित असतात. कर्मचारी तर जीव मुठीत धरून काम करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकजण घरी बसून काम करतात. त्यामुळे पंचायत समितीत ज्यादा गर्दी होत नाही. म्हणून अद्यापही कोणी जखमी झाले नाही. दुरुस्ती केली की पुन्हा पडते. 
आतापर्यंत यावर लाखोंचा खर्च दुरुस्ती पोटी केला आहे. परंतु काही दिवसांत पुन्हा तेच, त्यामुळे या दुरुस्ती नक्की कोणासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील काही वर्षांपासून कल्याण पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा, वाढीव चटईक्षेत्राचा प्रश्न कधी केडीएमसी तर कधी मंत्रालय असा प्रवास करतो आहे. पण तो नक्की कोठे "लाॅकडाऊण" झाला आहे हे सांगणे कठीण आहे.
सध्या कल्याण पंचायत समितीच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या इमारतीसाठी सुमारे ६७ लाख रुपये कामाची वर्क आॅर्डर निघाल्याचे कल्याण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता एस आर चव्हाण यांनी सांगितले. तसेच ही  स्टक्चर दुरुस्ती (संरचनात्मक) दुरुस्ती असून पावसाळ्यानंतर या कामाला वेग येईल असे ही ते म्हणाले. 
कल्याण पंचायत समितीवर सर्वाधिक काळ शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे आतापर्यंत २५ते३० सभापती उपसभापती यांनी सत्ता उपभोगलेली आहे. सुदैवाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देखील कल्याण तालुक्याला मिळाले आहे. त्यामुळे आतातरी कल्याण पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा कायमस्वरूपी तोडगा निघावा ऐवढीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे. तर आतापर्यंत कल्याण पंचायत समितीच्या इमारतीची किती वेळा दुरुस्ती झाली यावर किती खर्च केला याचा हिशोब विचारला पाहिजे असे मत डॉ सोमनाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया : 
किरण चंदू ठोंबरे (पंचायत समिती सदस्य, खोणी गट) "कल्याण पंचायत समितीच्या इमारतीची दुरुस्ती ही केवळ ठेकेदारासाठी व काही लोकांच्या टक्केवारी साठी केली, जातेय, वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. जीव मुठीत धरून आम्हाला बसावे लागते आहे",

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...