Monday 27 July 2020

रायगड हॉस्पिटल मधील कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करणार !! "पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे"‌.

रायगड हॉस्पिटल मधील कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करणार !! "पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे"‌.


     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील  कर्जत तालुक्यात असलेल्या रायगड कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करणार, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल मधील कोविड रुग्णालयाची पाहणी दौरा कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
     यावेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती उत्तम कोळंबे, अशोक भोपतराव, पंचायत समितीचे माजी सभापती तानाजी चव्हाण, प्रदीप ठाकरे, नगरपालिका विरोधी पक्ष नेते शरद लाड, प्रांताधिकारी वैशाली ठाकूर-परदेशी, तहसिलदार विक्रम देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी.के.मोरे, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, रायगड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. नंदकुमार तासगावकर आदि उपस्थित होते.
    यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, रायगड हॉस्पिटलमधील कोविड उपचार केंद्र सुरू आहे, परंतु अधिक क्षमतेने जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी प्रमुख कोविड हॉस्पिटल बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून येथे ४०० बेडची व्यवस्था देखील आहे. त्यामुळे त्यातील २०० बेड हे ऑक्सिजन सुविधेसह तयार केले जात आहेत.    शासनाकडून तेथे एकावेळी २०० बेड हे कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी आता रायगड हॉस्पिटल मध्ये पाच व्हेंटिलेटर उपलब्ध असून शासनाकडून आणखी पाच व्हेंटिलेटर पुरविले जातील.
      या रुग्णालयातील ४०० पैकी उर्वरित २०० बेड हे कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आहेत, जिल्ह्यात यापूर्वी पनवेल उप जिल्हा रुग्णालय, पनवेल आणि एमजीएम तसेच जिल्हा रुग्णालय,अलिबाग अशा तीन ठिकाणी कोविडच्या रुग्णांवर उपचार सुविधा सुरु करण्यात आल्या  आहेत.   मात्र रायगड हॉस्पिटलची क्षमता लक्षात घेता हे रुग्णालय केवळ कर्जत नाहीतर खालापूर,उरण या तालुक्यातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगून पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यात सध्या करोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे.  जिल्ह्यासाठी टेस्टिंग लॅब मंजूर करण्यात आली आहे. जेणेकरून जिल्ह्यातील कोविड रुग्णांचे अहवाल लवकर मिळतील. भविष्यात लागणारी गरज लक्षात घेऊन शासनाने रायगड जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाची क्षमता वाढविण्यावर भर दिला आहे . त्यामुळेच आपण कर्जत येथे सुविधा उपलब्ध असल्याने रायगड हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी आलो आहोत. येथे पाहणी केल्यानंतर ऑक्स‍िजन सुविधेसह आवश्यक असलेले बेड वाढविण्याचे काम शासन नक्कीच करू शकते, हे दिसून आले आहे. त्यामुळे शासन या ठिकाणी ४०० बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रित करीत आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा आणि मनुष्यबळ यासाठी रायगड हॉस्पिटलकडून प्रस्ताव आल्यावर शासन उचित कारवाई करेल.
      सुरुवातीला पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगड हॉस्पिटल मधील शासनाच्या आणि खासगी तत्वावर चालविण्यात येणाऱ्या करोना रुग्ण कक्षाची पाहणी केली. यावेळी रायगड हॉस्पिटल मधील सर्व सोयी-सुविधांची सविस्तर माहिती डॉ. तासगावकर यांनी त्यांना दिली.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...