म्हारळ येथील खदाणीत बुडून गणेशभक्तांचा मृत्यू, मृतदेह शोधण्यात पावसामुळे अडचणी?
कल्याण (संजय कांबळे) : बंद असलेल्या खदाणीत गणेश विसर्जन करु नये म्हणून वारंवार सांगून ऐकत नसल्याने अखेर पोलीस स्टेशन ला पत्र दिले तरीही न ऐकणा-या एका गणेश भक्तांचा म्हारळ गावातील जयहिंद नामक खदाणीत बुडून नुकताच मृत्यू झाला आहे त्याचा मृतदेह अद्यापही सापडला नाही. पावसामुळे तो शोधण्यात अडचणी येत आहेत. या घटनेने गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे.
पोलीस आणि ग्रामस्थ यांच्या कडून मिळालेल्या माहितीवरून
अमोल पवार वय १९ वर्षे रा विठ्ठलवाडी हा गणेशोत्सवाच्या निमित्ताने म्हारळ गावातील त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. तो मित्रांबरोबर गणेश विसर्जनासाठी जयहिंद खदाणीत गेला होता ही खदाण ५०/६० फुट खोल असून पावसामुळे तुडूंब भरलेली आहे. अमोल व त्याचा मित्र पाण्यात उतरले परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने अमोल बुडाला त्याचा मित्र कसातरी वाचला असे ग्रामस्थांनी सांगितले.काल उशीर पर्यंत अमोलचा शोध घेतला पण मुसळधार पडणा-या पावसामुळे शोद घेण्यात अडचणी येत होत्या.
कल्याण तालुक्यातील म्हारळ गावातील शेवटच्या टोकास जावसई गावास लागून असलेल्या डोंगर व टेकड्या परिसरात मोठय़ा प्रमाणात दगड खाणी आहेत. शेजारी उल्हासनगर सारखे मोठे व विकसनशील शहर असल्याने बांधकामाला लागणारे मटेरियल, खडी, डबर, येथून सहज मिळत असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बहरला. त्याच वेळी लोकसंख्या देखील वाढली. अगदी लोकवस्ती इतकी वाढली की डोंगर, टेकड्या, अगदी खदाणीत चाळी उभ्या राहिल्या. त्यामुळे येथेही अपघात मरणा-याची संख्या देखील वाढतच होती. यामुळे साहजिकच येथील खदाणी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली. याचा परिणाम म्हणून काही खदाणी बंद पडल्या आहेत.
अशातीलच दिपक कुकरेजा नामक मालकाची जयहिंद खदाणी गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. येथे मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी निर्माण झाल्याने व बाजूला उल्हासनगर शहर असल्याने परिसरातील अनेक तरुण या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी, मोजमजा करण्यासाठी येतात शिवाय गणेशोत्सव काळात येथे गणेश मुर्ती विसर्जन करतात यामुळे येथे अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहेत.
याला कंटाळून जयहिंद खदाणी मालकाने येथील तरुण व नागरिकांना येथे विसर्जन करु नये असे सांगितले. परंतु गेल्या १० वर्षापासून येथे विसर्जन केले जाते. गणेश भक्तांना विरोध केला असता दारु पिऊन येवून आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते असे जयहिंद खदाणीच्या मॅनेजरने सांगितले त्यामुळे याला कंटाळून आपणच टिटवाळा पोलीस ठाण्यात पत्र ही दिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान अमोल पवार याचा मृतदेह अद्यापही सापडला नसून कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. तर सध्या गणेशोत्सव साजरा होत आहे, त्यामुळे खदाणी मालकाने जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. म्हणून या मालकाला कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार असल्याचे म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी सांगितले. तथापि अमोल पवार या गणेशभक्तांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment