Friday 25 September 2020

शहापूर-मुरबाड-कर्जत रस्त्याकडे खासदार कपिल पाटील यांनी वेधले लोकसभेचे लक्ष !! **निक्रुष्ठ कामामुळे नवा ठेकेदार नेमण्याची मागणी**

शहापूर-मुरबाड-कर्जत रस्त्याकडे खासदार कपिल पाटील यांनी वेधले लोकसभेचे लक्ष !!
**निक्रुष्ठ कामामुळे नवा ठेकेदार नेमण्याची मागणी** 


मुरबाड {मंगल डोंगरे} : नवा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली रस्त्याच्या निकृष्ट व संथ गतीने सुरू असलेल्या कामाकडे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेचे शून्य प्रहरात काल लक्ष वेधले.    यामुळे तीन तालुक्यातील हजारो ग्रामस्थांचे हाल होत असल्याने संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून नवा ठेकेदार नेमण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.
शहापूर, मुरबाड आणि कर्जत तालुक्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या व मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे महामार्ग जोडणाऱ्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली रस्त्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली होती. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली (548 अ) हा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला. तसेच त्यासाठी ८५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामामुळे तिन्ही तालुक्यातील ग्रामस्थांचा वेगाने प्रवास होणार होता.
सद्यस्थितीत या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून निकृष्ट दर्जाचे व संथ गतीने सुरू आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे कामाचा व्याप असल्यामुळे संबंधित रस्ता राज्य सरकारच्या एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. या रस्त्याचे काम एमएसआरडीसीच्या नियंत्रणाखाली आहे. या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने सब कॉन्ट्रॅक्टर नेमून, त्याला ३ टक्क्याने काम दिले. तर सब कॉन्ट्रॅक्टरने आणखी एका सब कॉन्ट्रॅक्टरला ११ टक्क्याने काम दिले. या गोंधळात निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. त्याचा हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. 
केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याने एमएसएसआरडीकडे तत्काळ प्रस्ताव पाठवून संबंधित रस्त्याचे काम तत्काळ रद्द करावे. तसेच नव्या निविदा काढून, सध्याच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी आग्रही मागणी खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत केली.
दरम्यान, शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली रस्त्याच्या निकृष्ट कामांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. गेल्या दोन वर्षांत निकृष्ट कामांमुळे रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांचा बळी गेला. तर लहान-मोठ्या पुलांची कामे अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या संदर्भात भाजपासह विविध संघटनांनी तीव्र आंदोलनेही केली आहेत. यापूर्वीही खासदार कपिल पाटील यांनी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना पत्राद्वारे रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे लक्ष वेधले होते. तसेच कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...