Wednesday 28 October 2020

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत !!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत !!

 'धर्मराज्य पक्षा'ची गृहमंत्री अनिल देशमुखांकडे पत्राद्वारे मागणी


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
                प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ठाणे शहरात सुमारे ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे उघड झालेले आहे. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची अशी असून, एकट्या ठाणे शहरात सामाजिक सुरक्षिततेबाबत अशी दुरवस्था असेल, तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किती भयावह परिस्थिती असावी? असा सवाल 'धर्मराज्य पक्षा'ने उपस्थित करून, त्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याची मागणी केली आहे. नुकतीच मुंबई, अंबरनाथ आणि पंढरपूर या ठिकाणी पोलिसांना झालेली मारहाण पाहता, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडलेली असावी, याबाबत चिंता व्यक्त करून, याच अनुषंगाने पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत, सन २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयाची गृहविभागाने प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. आगामी सणासुदीचा काळ बघता, तसेच घातपाताची शक्यता लक्षात घेता, महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांच्या मोक्याच्या व संवेदनशील  ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत आणि याची गंभीरपणे नोंद घेण्याची विनंती नितीन देशपांडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

               सप्टेंबर-२०११ मध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या कार्यशाळेला तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील, तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली होती. तेथील सुरक्षा यंत्रणांची पाहणी करण्याबरोबच कोणत्या यंत्रणा महाराष्ट्रात आणता येतील याचाही आढावा त्यावेळी गृहमंत्र्यांनी घेतला होता. १९६७ साली स्कॉटलंडमध्ये सर्वप्रथम सीसीटीव्ही बसविण्यात आला होता. तिथल्या कोणत्याही आस्थापनेत चोख सुरक्षाव्यवस्था असते. एवढे असूनही तिथली सुरक्षाव्यवस्था 'फ्रेंडली सिक्युरिटी'सारखी भासते. याच पार्श्वभूमीवर, २०११ साली सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने, स्कॉटलंड यार्डच्या धर्तीवर मुंबईत व संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणा राबविण्याचा निर्णय प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलून दाखवला होता. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्राधान्याने उल्लेख केला होता. यादरम्यान, मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या निमित्ताने आर.आर. पाटील यांनी मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पाऊले उचलण्यास सुरुवात केली असली, तरी दुर्दैवाने त्यानंतर मात्र, राज्य सरकारने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात गांभीर्याने कार्यवाही केल्याचे जाणवले नाही. त्याचाच परिपाक म्हणून, ठाणे शहरात ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद असल्याचे ठामपणे सांगता येईल, असे देशपांडे यांनी नमूद केले आहे. तरी, महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री या नात्याने, करदात्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या मागणीचा विचार करावा आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट दर्जाची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी करून, ती सक्षमपणे कार्यान्वित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी 'धर्मराज्य पक्षा'चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलेल्या पत्रात शेवटी केली आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...