Saturday 27 February 2021

स्कूल बसचे चाक अकरा महिन्यांपासून रुतलेलेच ! "शाळा पुन्हा बंद झाल्याने चालक-मालक हवालदिल"....

स्कूल बसचे चाक अकरा महिन्यांपासून रुतलेलेच !

"शाळा पुन्हा बंद झाल्याने चालक-मालक हवालदिल"....


पुणे : करोनाची स्थिती मध्यंतरी काही प्रमाणात निवळल्यामुळे शाळा सुरू झाल्या आणि स्कूल बसही सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र करोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्यामुळे शाळा बंद झाल्याने स्कूल बस चालक-मालक आणि सहायक हवालदिल झाले आहेत.
 
तब्बल अकरा महिन्यांपासून करोना संकटाच्या गाळात रूतलेले राज्यातील एक लाखांहून अधिक स्कूल बसचे चाक अद्यापही मोकळे होऊ शकले नाही. 

टाळेबंदीत शिथिलता देण्यात आल्यानंतर पहिल्याच टप्प्यात वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यामुळे माल आणि प्रवासी वाहतुकीतील वाहने सुरू झाली असली, तरी शाळा बंदमुळे स्कूल बस सुरू होऊ शकल्या नाहीत. 
करोनाची स्थिती काहीसी निवळल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय त्या-त्या स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला होता. 

त्यानंतरही स्कूल बसला परवानगी देण्यात आली नव्हती. काही दिवसांत अधिकृतपणे स्कूल बस सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, राज्यात पुन्हा करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आणि शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे स्कूल बस सुरू होण्याची शक्यता पुन्हा मावळली. 

अकरा महिन्यांपासून स्कूल बस बंद असल्याने त्यावरील चालक-मालक आणि विद्यार्थ्यांची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या सहायकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. 
अनेक जण भाजी विक्री किंवा इतर काहीतरी कामधंदा करून कशीबशी गुजराण करीत आहेत. 

वाहने बंद असल्याने राज्य शासनाने डिसेंबरपर्यंत करात माफी दिली होती. ही मुदत आता संपली आहे. बॅका किंवा वित्त संस्थांचे हप्तेही सुरू आहेत. त्याचप्रमाणे विम्याबाबत कोणतीही सवलत मिळालेली नाही. व्यवसाय बंद असताना स्कूलबस चालकाच्या डोक्यावर अप्रत्यक्ष कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.

No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...