ठाणे जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची सभापतीची मागणी !
कल्याण, (संजय कांबळे) : अंबरनाथ तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार 'लेटरबांम्ब' व्दारे उघडकीस आणलेल्या निलंबित विस्तार अधिका-यांनी केलेल्या आरोपांमुळे बालविकास विभाग बदनाम होत आहे. त्यामुळे यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागाचे जिल्हा सभापती श्रीमती रत्नप्रभा तारमळे यांनी केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील पंचायत समितीच्या बालविकास विभागातील भ्रष्टाचार याच कार्यालयात काम करणाऱ्या एका विस्तार अधिका-यांनी जानेवारी २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळवला होता. प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, गटविकास अधिकारी, यांना कसे 'पाॅकिट' दिले जाते, न दिल्यास कारवाईचा दम कसा दिला जातो? विविध अनुदानित शासकीय योजनांमधून कसा भ्रष्टाचार सुरू आहे. मदतनीस सेविका यांच्या कडून पैसे कसे घेतले जाते, यातून नियुक्ती कशी नियमबाह्य केली जाते? हा सर्व प्रकार या पत्रात व आॅडियो मध्ये असून याची चौकशी न करता मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे व महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसले यांनी या विस्तार अधिका-यांलाच निलंबित करुन भ्रष्टाचार करणा-यांना अभय दिले.
काही महिन्यांपूर्वी कल्याण विभागातील मुख्य सेविकेला 'पोषण आहार' घोटाळा प्रकरणी याच डेप्युटी संतोष भोसले यांनी रंगेहाथ पकडून तिच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व स्वतः ची पाठ थोपटून घेतली. परंतु येथे मात्र वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याहूनही विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराची तक्रार केली म्हणून हे उजेडात आले. पण असा किती भ्रष्टाचार होत असेल की त्या विरोधात कोणीही 'भ्र' काढीत नाही. तर हे अधिकारी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना काही कळूनच देत नाहीत. असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या अंबरनाथ तालुक्यातील बालविकास अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि याबाबतीत प्रसिद्ध झालेल्या बातम्या यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचा बालविकास विभागाची 'बेअब्रू' झाली आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल विचार करून दोषींवर कारवाई कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बालविकास सभापती श्रीमती रत्नप्रभा तारमळे यांनी मुख कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या कडे केली आहे. त्याच प्रमाणे या विभागातील वाढता भ्रष्टाचार पाहता गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या खर्च व इतर बाबींची माहिती घेत असल्याचे सभापती तारमळे मॅडम यांनी सांगितले आहे. तर याबाबत झेडपी अध्यक्षा सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आणि इतर जिल्हा परिषद सदस्य काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment