Saturday, 3 April 2021

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या २१ गावांमधील पाणी समस्या होणार पूर्णपणे दूर !!

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या २१ गावांमधील पाणी समस्या होणार पूर्णपणे दूर !!


         बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : पाच वर्षांपूर्वी राज्याच्या विविध भागांत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येसंदर्भात कामे करण्यात आली. त्या  कामाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड परिसरातील आगामी दोन महिन्यांत दोन गावांत योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. आगामी दीड ते दोन वर्षांत एकवीस गावांमधील पाणी समस्या पूर्णपणे दूर होईल, असा विश्वास नाम फाऊंडेशनचे सर्वेसर्वा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्य़क्त केला. ते पाचाड येथे आयोजित जलसंवर्धन परिषदेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी बोलताना मकरंद अनासपुरे यांनी किल्ले सिंहगडाच्या तुलनेत किंवा किल्ले रायगड परिसरातील गावांमध्ये असलेली स्वच्छता कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
         देशाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडावर परिसरातील एकवीस गावांच्या नैसर्गिक जलस्रोतांची तपासणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सरकार रायगड प्राधिकरण व नामच्या मदतीने रायगडाला अधिकाधिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. 
       स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी किल्ले रायगड परिसरातील विविध समस्यांची पूर्तता नामच्या मदतीने अधिक वेगात होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर माजी आमदार माणिकराव जगताप यांनी याप्रसंगी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची कामे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शक्य झाल्याचे रोखठोक स्पष्टोक्ती याप्रसंगी केली. एकूणच गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित असलेल्या नाम फाऊंडेशनच्या मदतीच्या किल्ले रायगड परिसरातील जलसंवर्धन परिषद पूर्णपणे यशस्वी झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले. या परिषदेला किल्ले रायगड परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच लोकप्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, सभापती सौ. सपना मालुसरे, जि प सदस्य संजय कचरे, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, प्रांताधिकारी सौ. प्रतिभा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, डीवायएसपी नीलेश तांबे, शहर पोलिस निरीक्षक शैलेश सणस आणि सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी तसेच रायगड प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सातपुते, बुरले उपस्थित होते.
         मागील आठ दिवसांपासून नाम फाऊंडेशनच्या मदतीने रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेला प्रस्तावाचे ग्रामस्थांमध्ये अत्यंत कौतुक आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून किल्ले रायगड परिसरात गेल्या दोन दशकांपासून असलेली पाणीटंचाई कशा पध्दतीने दूर होऊ शकते, याकडे या परिषदेमधील निर्णयाबाबत सर्वांनीच लक्ष वेधले होते  .
          नाना पाटेकर यांनी आगामी दोन महिन्यात २१ गावांपैकी दोन गावांतून या योजनांची सुरुवात केली. आगामी दीड ते दोन वर्षांमध्ये सर्व २१ गावांतील पाणी समस्या पूर्णपणे दूर करण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांची राजधानी असणारा हा परिसर पाणीयुक्त असणार असा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी नैसर्गिक स्त्रोत यांची तपासणी तातडीने करण्यात येईल. येथील समस्या मार्गी लावण्याकरिता तज्ज्ञ मंडळींची सहकार्य घेऊ असेही त्यांनी सांगितले. किल्ले रायगड परिसरातील पाणी समस्या करता अशा प्रकारचा समारंभ आयोजित करावा, ही खेदजनक बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
        छत्रपती संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या या जलसंवर्धन परिषदेमध्ये बोलताना म्हणाले, छत्रपती हे वंशपरंपरेने राजे असले तरीही आपण सगळेच स्वयंघोषित राजे असल्याचे ते म्हणाले. या विकासकामांसाठी आपणास कोणत्याही राष्ट्रीय पुरस्कार आवश्यक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
        नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे म्हणाले, आम्ही  नाम फाउंडेशनचे प्रतिनिधींपेक्षा एक शिवभक्त म्हणून या परिसरात आलो. राजांनी तीनशे वर्षांपूर्वी निर्माण केलेले कार्य काळाच्या ओघात बाजूला गेले असल्याने ते शोधून काढून या परिसरातील जनतेला पुन्हा एकदा पाणी समस्येतून बाहेर काढू. राज्यातील विविध भागांत काम करत असताना कोकणातील मालवण, रत्नागिरी येथून आपण कामे सुरू केली. पोलादपूर तालुक्यातील आडवळे येथे एक तलाव नामच्या मदतीने सुरू झाला. महाडमधील काही आदिवासी वाडय़ांवर  नामच्या माध्यमातून विविध योजना सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली. या पाण्याच्या योजनांबरोबर प्रत्येक शिवभक्तांनी एक झाड लावणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  त्याची निगा संबंधित शिवभक्तांनी घ्यावी, असेही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. 
         छत्रपती शिवरायांच्या काळातील अनेक समरप्रसंग विविध किल्ल्यांवर दाखविले. स्थानिक शूरवीरांना याबाबतची संधी प्राप्त होऊन आगामी पिढीतील शालेय बालकांनादेखील आपला इतिहास पुन्हा कळू शकेल, अशी सूचना त्यांनी केली. राज्यातील गडकिल्ले हे शौर्याचे प्रतीक असून त्यांचे रक्षण करणे आपली कर्तव्यपूर्ती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एकवीस गावातून नाममधून होणारे काम हे दीर्घकालीन सुरु होणार असल्याने आगामी काळात पायलट प्रोजेक्ट म्हणून काही योजना आपण सुरू करणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले.
         रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. रायगड परिसरातील एकवीस गावांना हेरिटेज व्हिलेज म्हणून निर्माण करण्याचा मनोदय आहे, असे त्यांनी जाहीर केले. या मार्गावर होणारे महामार्गदेखील अशाच ऐतिहासिक पध्दतीने निर्माण व्हावेत, यासाठी स्थानिक प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना व्हावी. त्यांच्याकडे याबाबतचे सर्वाधिकार द्यावेत, अशी विनंती रायगडच्या पालकमंत्री नामदार अदिती तटकरे यांना केली.
       छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी किल्ले रायगड व परिसरात निर्माण केलेले नैसर्गिक स्त्रोतचा वापर आगामी काळात शोधून काढले जातील. शास्त्रोक्त पध्दतीने या गावांतील लोकांना सुविधा देण्याकरिता आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त करून सरकार रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
       खासदार सुनील तटकरे म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाम फाउंडेशन करीत असलेले काम कौतुकास्पद आहे. देशाचा मानबिंदू असणाऱ्या किल्ले रायगड परिसरातील २१ गावातील एकवीस गावांचा पाणीप्रश्न करता एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गावांतील नैसर्गिक पाण्याचे स्रोत शोधून काढणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
        आगामी काळात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरून हजारो लोक किल्ले रायगडच्या परिसरात येणार असल्याने येथील विविध असणाऱ्या समस्यांची पूर्तता विहित काळामध्ये करण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे अर्थमंत्री म्हणून पाचाड परिसरात शिवसृष्टी योजना मंजूर केली होती, याची आठवण करून दिली. किल्ले रायगडासाठी नियोजित नियोजन प्राधिकरणातून विविध कामे व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
       आदिती तटकरे यांनी किल्ले रायगडाच्या पुनर्वैभवाची स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न एकत्रितपणे झाल्यास हे काम सोपे होईल  असे स्पष्ट करतानाच याबाबत सरकारने पहिल्या कॅबिनेट बैठकीपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड प्राधिकरणाकरीता सुमारे २० कोटी रुपयांचा धनादेश दिला होता याची आठवण करून दिली. रायगडच्या उत्तर म्हणून अभिमानास्पद असलेली घटना तसेच रबाडाचे संवर्धनासह एकवीस गावांच्या विकासासाठी स्थानिकांचे सहकारी अत्यंत महत्त्वाचे आहे. या परिषदेला परिसरातील विविध सरपंच, लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. 
       किल्ले रायगड ही आपली अस्तित्वाची बाब आहे. शिवभक्तांमध्ये आगामी काळात होणारी वाढ लक्षात घेता पाचाड परिसरात एमटीडीसीच्या असलेल्या जागेमध्ये ऐतिहासिक पध्दतीने निर्मिती करण्यासाठी रायगड प्राधिकरणाने आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पाचाड परिसरामध्ये येत्या सहा महिन्यांत हेलिपॅड निर्माण करण्यात येईल, असे त्यांनी घोषित केले. आगामी काळात किल्ले रायगडाला अधिकाधिक वैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न सर्वांच्या मदतीने करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
         महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी किल्ले रायगड परिसरातील विकासात्मक गावाकरिता सरकार रायगड प्राधिकरण काम करीत आहे. आता नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या मदतीमुळे या भागातील असणाऱ्या समस्या वेगाने पूर्णत्वास जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याकामी अपेक्षित असणारी सर्व मदत देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
       माजी आमदार माणिकराव जगताप यांनी कोल्हापूरहून येऊन छत्रपती संभाजीराजे यांनी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून येथे सुरू केलेले काम हे कौतुकास्पद आहे. रायगड प्राधिकरणाची स्थापना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शक्य झाली आणि त्यांनीच तीनशे कोटी रुपयांचा निधी यासाठ दिला होता, याचे स्मरण दिले. 
        आपण रायगड किल्ल्याच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त असून सांदोशी या गावचे रहिवासी असल्याचे सांगून या परिसरात सन २००५ साली काळकुंभे जलविद्युत प्रकल्प गेल्या सोळा वर्षांपासून बंद पडला आहे, असा खेद त्यांनी व्यक्त केला. पाणी हे जीवन असून सरकार पलीकडे काम करणारी माणसे म्हणून नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य अधिकच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आम्ही राजकीय मंडळी स्वार्थी असून आम्हाला पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरे जावयाचे असते. जनतेच्या या प्रश्नांकरिता नाम फाऊंडेशनच्या मदतीने केवळ २१ गावातीलच नव्हे तर अशाच पध्दतीने महाड तालुक्याचा पाणीप्रश्न संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल. नाम फाऊंडेशननेदेखील जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
       केवळ आठ दिवसांच्या सूचनेवरून रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी या जलसंवर्धन परिषदेचे आयोजन पाचाड येथील धर्मशाळा परिसरामध्ये केले होते. या कार्यक्रमाला सरकारच्या विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच २१ गावातील सरपंच स्थानिक लोकप्रतिनिधी राजिप पंचायत समिती सदस्य सभापती उपस्थित होते. यामुळे रायगड प्राधिकरणाला अपेक्षित असलेली जलसंवर्धन परिषद यशस्वी झाल्याचा विश्वास उपस्थित असलेल्या विविध सरपंच तसेच स्थानिक नागरिकांनी व्यक्त  केला.

No comments:

Post a Comment

माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम मदत याचिका फेटाळली; जेएनपीए वाढवण बंदराच्या नियोजित विकासासाठी पुढील कार्यवाही करणार !!

माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम मदत याचिका फेटाळली; जेएनपीए वाढवण बंदराच्या नियोजित विकासासाठी पुढील कार्यवाही करणार !! उरण द...