Wednesday, 14 April 2021

हनुमानाचा जन्म कुठे झाला यावरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वाद सुरु ! 'दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनी हनुमानाचा जन्म आपल्याच राज्यात झाल्याचा दावा केला आहे'

हनुमानाचा जन्म कुठे झाला यावरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वाद सुरु !


'दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनी हनुमानाचा जन्म आपल्याच राज्यात झाल्याचा दावा केला आहे'

अरुण पाटील, (भिवंडी) :
      श्रीरामभक्त मारूतीरायाचा जन्म कुठे झाला? या प्रश्नावरून आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात वाद निर्माण झाला आहे. दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनी हनुमानाचा जन्म आपल्याच राज्यात झाल्याचा दावा केला आहे. कर्नाटकमधील शिवमोगातील धर्मगुरुंनी हनुमानाचा जन्म हा उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण इथे झाल्याचा दावा केला आहे.
        यापूर्वी कर्नाटकातीलच दुसऱ्या एका धर्मगुरुंनी दावा केला होता की हनुमानाचा जन्म हा कोप्पल जिल्ह्यातील आणेगुडीजवळच्या किश्किंदा भागात असलेल्या अंजनाद्री पर्वतरांगेत झाला होता. कर्नाटकातील धर्मगुरुंचे दावे ऐकून संतापलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की हनुमानाचा जन्म कर्नाटकात नाही तर आंध्र प्रदेशात झाला होता. तिरुपती इथल्या सात पर्वतांपैकी अंजनाद्री नावाच्या पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला होता असा दावा करण्यात आला आहे.
            कर्नाटकातील शिवमोगा येथील रामचंद्रपुरा मठाचे प्रमुख असलेल्या राघवेश्वरा भारती यांनी रामायणामधील काही वाक्यांचा हवाला देत म्हटले आहे की की खुद्द हनुमानानेच सीतेला सांगितले होते की त्याचा जन्म गोकर्ण इथे झाला आहे. राघवेश्वरा भारती यांनी म्हटलंय की रामायणातील या वाक्यामुळे हे सिद्ध होतं की हनुमानाची जन्मभूमी ही गोकर्ण होती तर कर्मभूमी ही अंजनाद्री येथील किश्किंदा होती.
           कर्नाटकाचे दावे खोडून काढण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानातर्फे एक समितीच स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये वेदांचा गाढा अभ्यास असलेले तज्ज्ञ, पुरातत्वाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती आणि इस्रोच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. या समितीला 21 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी अधिकारी के.एस.जवाहर रेड्डी यांनी म्हटलंय की हनुमानाचा जन्म हा आंध्र प्रदेशातील अंजनाद्री पर्वतावर झाला होता आणि आमच्याकडे त्याचे पौराणिक तसेच ऐतिहासिक, पुरातत्वशास्त्रीय पुरावेही आहेत.
            एकीकडे आंध्र प्रदेशात ही समिती नेमण्यात आली आहे तर दुसरीकडे कर्नाटकात अंजनाद्री येथील किश्किंदा भागाला हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून घोषित करण्याच्या योजनेला वेग आला आहे. हंपीजवळच्या किश्किंदा भागाचा रामायणामध्ये उल्लेख असून याच ठिकाणी लक्ष्मणाची आणि हनुमानाची भेट झाल्याचे सांगितले जाते. किश्किंदा भाग हा हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून घोषित करून तिथे मोठ्या संख्येत भाविक यावेत यासाठी सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं कोप्पलचे पालकमंत्री बी.सी.पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

बुलंद आवाजाचा बादशाह अनंतात विलीन ; 'कलावंत महेशकुमार मयेकर' यांचं दुःखद निधन !!

बुलंद आवाजाचा बादशाह अनंतात विलीन ; 'कलावंत महेशकुमार मयेकर' यांचं दुःखद निधन !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :             ...