Saturday 17 April 2021

जनतेला आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा देण्यास शासन-प्रशासन कटिबद्ध : पालकमंत्री आदिती तटकरे

जनतेला आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा देण्यास शासन-प्रशासन कटिबद्ध : पालकमंत्री आदिती तटकरे


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : कोविड-19 चा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, परिस्थिती चिंताजनक होत आहे. मात्र शासन व प्रशासन जनतेला आवश्यक त्या आरोग्य सोयी-सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज येथे केले.   
       जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी जिल्हास्तरीय कोविड प्रतिबंधक उपाययोजना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.
      यावेळी खासदार सुनील तटकरे, सर्वश्री आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावले, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के- पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, तहसिलदार विशाल दौंडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर हे प्रत्यक्ष तर रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार रवीशेठ पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.सचिन गुंजाळ, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त संजय शिंदे, तहसिलदार विजय तळेकर, अलिबाग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.घासे यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
    पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेऊन जनतेला जास्तीत जास्त आरोग्य सोयी सुविधा पुरविण्यात येतील. लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात येईल. मात्र त्याआधी खाजगी रुग्णालयांशी समन्वय साधून कोविड व्यतिरीक्त असलेल्या रुग्णांच्या उपचारासंबंधीची व्यवस्था व नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने योग्य ते नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल. लवकरच जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील नवीन इमारतीत 90 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
    कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी शासनाकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य त्या प्रमाणात लस उपलब्ध करून देणेबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे यांनी पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या की, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या पाहता व बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या पाहता आता त्यांच्यावर कठोर कारवाईस सुरुवात करावी, गर्दी करणाऱ्यांवर मास्क न घालणाऱ्यावर, करोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाईचे धोरण अवलंबवावे. ग्रामीण भागात लग्नसमारंभ कार्यक्रमांवर लक्ष ठेवावे, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी जनतेमध्ये जनजागृती करावी, लोकांचे प्रबोधन करावे आणि तरीही लोक प्रतिबंधक नियमांचे करीत नसल्यास कठोर कारवाई करावी, असेही त्या म्हणाल्या.
     बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संगणकीय सादरीकरणच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन करीत असलेल्या व येणाऱ्या काळात आवश्यक असणाऱ्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबतची सविस्तर माहिती उपस्थित सर्वांना दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, येत्या सोमवारपासून जिल्ह्यासाठी "कोविड रुग्णालय बेड व्यवस्थापन" सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात येणार आहे तसेच शासनाने नेमून दिलेल्या निकषात बसणाऱ्या खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात येत आहे. शिवाय दर पंधरा दिवसाला आवश्‍यक व योग्य पात्रता धारण करीत असलेल्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांचीही नियुक्ती करण्यात येत आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुबे व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनीही पोलीस विभागाकडून करोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती उपस्थितांना दिली.
    यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी जास्तीत जास्त आवश्यक वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांची ज्या ज्या माध्यमातून शक्य आहे त्या त्या माध्यमातून भरती करावी, कोविड- नॉन कोविड रुग्णाच्या उपचारांबाबत नियोजन करावे, विशेषतः ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन व कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा याची जबाबदारी स्वतंत्रपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावी, अशा सूचना मांडल्या.
    आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्णांना योग्य त्या आरोग्य सुविधा तत्परतेने मिळणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
   आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बेडची सोयीसुविधा, ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा तसेच लसीकरणाबाबत सुरळीत पुरवठा व्हावा, याकरिता आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मांडल्या.
   आमदार महेंद्र थोरवे यांनी जम्बो कोविड रुग्णालय स्थापित होण्याच्या दृष्टीने सर्वांनी मिळून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
    आमदार भरत गोगावले यांनी पोलादपूर, महाड, माणगाव भागात बेडची सुविधा व अन्य आरोग्य सुविधा सक्षमपणे उभी करण्याची तयारी असल्याचे सांगून या भागासाठी वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी पुरवावेत, अशी मागणी केली.
    आमदार रवीशेठ पाटील यांनी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना ऑक्‍सिजनचा व रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा व्हावा, अशी सूचना केली तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुग्णांचा आरटीपीसीआर चा अहवाल लवकरात लवकर प्राप्त व्हावा, वैद्यकीय अधिकारी कर्मचार्‍यांची भरती त्वरित करावी, ऑक्सिजनचा पुरवठा, कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा वेळेत व्हावा, अशा सूचना मांडल्या.
    या बैठकीच्या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर निश्चित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले व जनतेला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच वय वर्ष 45 वरील सर्वांनी लसीकरण करून घेणे, याबाबत आवाहन केले.
       बैठकीच्या शेवटी ऑक्सिजनच्या पुरवठयाबाबत समन्वयाची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, कोविड प्रतिबंधक लसबाबतच्या समन्वयाची जबाबदारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी तर रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी समन्वयाची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्यावर सोपविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...