ठाण्यात कोविड रुग्णाला ICU बेड देण्यासाठी डॉक्टरनेच घेतली दीड लाखांची लाच !
अरुण पाटील, भिवंडी :
संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोविड रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीयेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या संकट काळातही अनेकजण गैरफायदा घेत पैसे उकळत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे.
ठाणे महानगरपालिकेने कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी ग्लोबल कोविड रुग्णालयत उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना बाधितांवर मोफत उपचार करण्यात येतात. मात्र, या रुग्णालयात कोविड बाधित रुग्णाला दाखल करुन घेण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणी ठाणे मनपाकडे तक्रार करुन पोलिसांतही धाव घेतली. वसईतील रुग्णाच्या नातेवाईकाकडून दीड लाख रुपये घेण्याचा आरोप त्यांनी केला होता.
या प्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर मनपाकडून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात डॉ. परवेझ, श्रीमती नाजनीन, अबिद खान, ताज खान आणि अब्दुल गफार खान या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्लोबल रुग्णालयाचे काम हे मेसर्स ओमसाई आरोग्य केअर प्रा. लिमिटेडला देण्यात आलेले आहे. यांच्यातर्फेच या पाचही जणांची रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली होती. पोलिसांना संशय आहे की, आरोपी डॉक्टर परवेझ याने यापूर्वीही अशाच प्रकारे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयात दाखल करण्यासाठी पैसे घेतले असावेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, हा संपूर्ण प्रकार खूपच धक्कादायक आहे.
No comments:
Post a Comment