अनिल देशमुखांवरील कारवाई हा पूर्व नियोजित कट- हसन मुश्रीफ.
अरुण पाटील, भिवंडी :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. यावरून आता राजकारण तापू लागले आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट आहे. यात लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल. यातून देशमुख निर्दोष सुटतील असे ते म्हणाले.
अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी एनआयएकडे तपास देऊन किती दिवस झाले. तरी त्याचा तपास लागत नाही. वाझेंचे नाव मुख्य आरोपी म्हणून आले. त्यांची पोलीस कोठडी संपून न्यायालयीन कोठडी सुरू झाली. तरी या प्रकरणाचा छडा का लागला नाही, अशी विचारणाही मुश्रीफ यांनी यावेळी केली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे पत्र ज्या वेळी प्रसिध्द झाले. तेंव्हाच मी म्हणालो होतो की, हा नियोजित कट आहे. देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंग दिल्लीत गेले. पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि एनआयएकडे हा तपास गेला. पुराव्यांशिवाय अशी चौकशी होऊ शकते का? सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय अशी चौकशी करणे म्हणजे भाजपाने विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी केलेले कट-कारस्थान असल्याचा हल्लाबोल मुश्रीफ यांनी केला आहे. हा सगळा प्रकार राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. पण तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
No comments:
Post a Comment