तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही; सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसणार !
अरुण पाटील, भिवंडी :
तौत्के चक्रीवादळाचा मुंबई शहराला धोका नाही. हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने आज मुंबई महापालिकेत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसल्याचा हवामान खात्याने दिली माहिती.
मुंबईतील वाऱ्याचा वेग हा ताशी चाळीस ते पन्नास किमीपर्यंत जाऊ शकतो तर रविवारी १६ मे रोजी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी ६० किमीपर्यंत जाऊ शकतो. काही ठिकाणी हा वेग ताशी ८० किमीपर्यंतही जाऊ शकेल, अशी माहिती या बैठकीदरम्यान भारतीय हवामान खात्याद्वारे देण्यात आली आहे. त्याचवेळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत त्याबाबत खबरदारी घ्यावी लागणार असून त्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे.
मुंबईला वादळाचा धोका नसला तरी वादळी वारे वाहणार असल्याने व पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घरातच राहावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घरा बाहेर पडू नये. समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत रस्त्याच्या कडेला वा वस्तीत धोकादायक स्थितीत होर्डिंग असल्यास ते हटवण्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment