Friday 28 May 2021

आमची लढाई सरकारसोबत, कोणत्याही जातींविरोधात नाही. मराठा आरक्षण व हक्कांबाबत आम्ही कटिबद्ध – शिवसंग्राम जिल्हाप्रमुख अविनाश सावंत

आमची लढाई सरकारसोबत, कोणत्याही जातींविरोधात नाही. मराठा आरक्षण व हक्कांबाबत आम्ही कटिबद्ध – शिवसंग्राम जिल्हाप्रमुख अविनाश सावंत
 
       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : ५ मे २०२१ रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर रद्द केले आणि भविष्यातील लाखो तरुणांचे भविष्य दोलायमान  झाले. कित्येक तरुण तरुणींचे मानसिक खच्चीकरण झाले बहुसंख्यांक शेतकऱ्यांची मुले असल्यामुळे कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले होते. 
      एमपीएससी तथा विविध स्पर्धा परीक्षा मधून निवड मिळवली परंतु आरक्षण गेल्याने या सरकारने कोणालाही नियुक्ती दिली नाही. शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही. रोजगार नाही, आता तरुणांनी नेमके करायचे काय? हाच मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. आरक्षणासाठीची विद्यमान सरकारची भूमिका, शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी विविध योजना, सवलती या व इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ५ जूनला बीड येथे सर्व समाजबांधव, विविध संघटना, अनेक राजकीय व सामाजिक संघटना यांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनाच्या बळावर एक अभूतपूर्व मोर्चा शिवसंग्रामचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार विनायकराव मेटेसाहेब ह्यांच्या अधिपत्याखाली होणार आहे असे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश सावंत ह्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
     नुकतीच ह्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर शिवसंग्राम आणि विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी ह्याची ऑनलाइन मीटिंग होऊन अनेक गोष्टींचा ऊहापोह आणि मोर्चाची रणनीती ठरविण्यात आली. दि.५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘लढा आरक्षणाचा’ ही संकल्पना प्रमाण मानून “मराठा क्रांती संघर्ष मोर्चा” ह्या नावाने हा मोर्चा आयोजित केला असून आमची लढाई ही सरकारसोबत आहे, कोणत्याही जातींच्या विरोधात नाही असे प्राधान्याने स्पष्ट करण्यात आले. आमदार मेटेसाहेब पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या मनात नक्कीच पाप आहे त्यामुळेच  ते मराठा समाजासाठी काहीच निर्णय करायला तयार नाहीत.    
     सारथी योजनेचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे काम ठप्प आहे, अनेक शैक्षणिक सोयीसुविधा मिळत नाहीत या व इतर अनेक महत्वाच्या  बाबींकडे सरकारचे लक्ष वेधावे ह्यासाठीच कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा हजारोंच्या संख्येने पार पडणारच असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखविला.    
जिल्हाध्यक्ष श्री अविनाश सावंत पुढे म्हणाले की, समाजाच्या प्रश्नांवर कोणीही विरोध करू नका, आरक्षण आणि हक्क ही काळाची गरज आहे. गरीब मराठ्यांना आरक्षणाचे संरक्षण देऊन त्यांचे जीवनमान इतर बहुजनांच्या पातळीवर आणण्यासाठी गेली ३५/४० वर्षे समाजाने जबर संघर्ष केला. राजकीय, सामाजिक, रस्त्यावरची, न्यायालयीन इ. सर्व पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनेकांनी प्राणार्पण केले पण अजूनही हा समाज केवळ सरकारी अनास्थेपोटी आहे तिथेच आहे. 
      मराठा आरक्षण हा विषय महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ! एकूण ३५% मराठ्यांतील मोजके ५ ते १०% श्रीमंत, बागाईतदार, राजकारणी, सहकार-शिक्षण सम्राट इत्यादी सोडले तर इतर भूमिहीन, अल्पभूधारक, कष्टकरी,शेतमजूर, हमाल, माथाडी, कामगार, रिक्षाचालक, घरेलू काम करणारे, हातावर पोट असणारे आदी समाजातील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी लढायचे आहे.
मराठा क्रांती मोर्चात आम्ही "सामाजिक भान" काय असते हे जगाला दाखवलंय. 
      आत्ता ५ जूनला बीड येथे निघणाऱ्या "मराठा क्रांती संघर्ष मोर्चात" सर्व कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करून परत एक एल्गार  जगाला दिसेल. मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटाइझर इत्यादी आवश्यक त्या साधनांचा वापर करीत हा मोर्चा निघणार आहे. 
     हा मोर्चा मराठ्यांसाठी न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या सर्व संघटनांसाठी मुक्त तर आहेच पण इतर समाजासही तो मुक्त आहे.       
     सदर मोर्चास जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी भेटीगाठी चालू असून विविध संघटनांचे प्रमुख, सकल मराठा समाज पदाधिकारी, अनेक क्षेत्रांतील मान्यवर,विविध समविचारी संघटना ह्यांच्याशी चर्चा सुरू आहे. शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनंत देशमुख, कार्याध्यक्ष शंकरराव थोरवे, उपाध्यक्ष आप्पा सत्वे जिल्हा सदस्य रमेश मते, ऋषिकांत पोतदार आणि ईतर पदाधिकारी हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत असेही शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत ह्यांनी शेवटी सांगितले. 
 

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...