Friday, 25 June 2021

मंदिरे कधी खुली करणार भक्तांचा टाहो ....सगळ्यांवरचे निर्बंध शिथिल मग देऊळे का बंद? भाविक भक्तांची प्रशासनास आर्त साद

मंदिरे कधी खुली करणार भक्तांचा टाहो ....सगळ्यांवरचे निर्बंध शिथिल मग देऊळे का बंद?

भाविक भक्तांची प्रशासनास आर्त साद


उर्मिला जाधव, टिटवाळा -: गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मंदिर कधी उघडणार असा सवाल भाविक-भक्त करीत आहेत. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने २१ जून पासून सर्वच अस्थापनांची बंधने शिथिल करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. परंतु मंदिरे उघडण्यास प्रशासने परवानगी देत नसल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.


राज्य शासनाने २१ जून पासून लाॅकडाऊन शिथिल केल्याने बियर बार, वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारूची दुकाने, हॉटेल, सिनेमागृह लग्नाचे हॉल, सलून, पार्लर आदींना अस्थापना सरकारने पूर्णवेळ उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र याच लाॅकडाऊच्या शिथिलते मध्ये  मंदिरे उघड्याची कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व नवसाला पावणारे म्हणून मोठी ख्याती पावलेले सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा येथे आहे. हे मंदिर गेल्या दोन वर्षात केवळ तीन महिने सुरू होते.


आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने अनेकांनी साकडे घालून नवस केलेले आहेत. ते नवस फेडण्यासाठी अनेकांनी मंदिरात जाऊन आपल्या देवाला भक्तिभावाने पाहण्याची इच्छा असते. कोणी नवीन वाहन खरेदी केलेले असते तर कोणाला नवीन व्यवसाय सुरु करावयाचा असतो. तर काहींना नवविवाहितेला आपल्या कुलदेवतेला दर्शनास घेऊन जाण्याची इच्छा असते. यासाठी अनेक भाविक मंदिर ट्रस्टींना फोन करून मंदिर कधी उघडणार आम्हाला आत मध्ये प्रवेश कधी मिळणार, आम्ही देवाचे दर्शन घेऊ शकतो का ? अशी विनंती करतात. परंतु सरकारने केवळ मंदिरांवर घातलेल्या निर्बंधांमुळे भाविकांची मोठी अडचण होत आहे. 

त्याचप्रमाणे मंदिराच्या आजुबाजूला असलेल्या फुल, हार, पूजा साहित्य विक्रेते, हॉटेल व्यवसायिक, सुरक्षा रक्षक, पार्किंग व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच मंदिरात असलेले आचारी, साफ सफाई करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून मंदिराचे उत्पन्न बंद असल्याने त्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मंदिरे बंद असल्याने मंदिर ट्रस्ट कडून गोरगरिबांना होणारी मदत पूर्णपणे बंद आहे. मंदिर ट्रस्टीकडून अनेक लोकोपयोगी शिबिरे, उपक्रम राबविले जातात त्यामध्ये मोफत आरोग्य शिबीर, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर, वह्या पुस्तके वाटप, आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबविणे मंदिर ट्रस्टींना शक्य होत नसल्याने गोरगरिबांना त्या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

मंदिर ट्रस्ट कडून राज्य सरकारने आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आखून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पालन पालन करण्याचे ट्रस्टीकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन भाविकांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवणे, प्रत्येकाचे टेंपरेचर चेक करून ऑक्सी मीटरने ऑक्सिजन लेवल चेक करणे, हातावर सैनीटायजर टाकून हात स्वच्छ करणे, त्याचप्रमाणे आजारी भाविकांना आत प्रवेश न देणे या गोष्टी काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहेत. तरीदेखील राज्यसरकार मंदिरे उघडण्यास परवानगी देत नसल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार भाविकांवर प्रचंड अन्याय करीत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. टिटवाळा येथील मंदिर लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी भाविक-भक्त प्रशासनाला आर्त हाक साद घालत आहेत.

प्रशासनाने सर्व आस्थापना २१ जून‌ पासून सुरू केली, परंतू लोकांच्या श्रध्दा व भावनचे ठिकाण म्हणजे मंदिरे. ती बंदच ठेवली आहेत. ती लवकरात लवकर सुरू करावी व आम्हाला आमच्या देवाची भेट व्हावी.
नारायण सुरोशी, भाविक

टिटवाळा गणेशाला मोठ्या भक्तिभावाने अनेकांनी साकडे घालून नवस केलेले आहेत. ते नवस फेडण्यासाठी अनेकांनी मंदिरात येऊन देवाला भक्तिभावाने पाहण्याची इच्छा आहे. यासाठी अनेक भाविक आम्हा मंदिर ट्रस्टींना फोन करून, मंदिर कधी उघडणार, आम्हाला आत मध्ये प्रवेश कधी मिळणार, आम्ही देवाचे दर्शन घेऊ शकतो का ? अशी विनंती करतात.
सुभाष जोशी, विश्वस्त, टिटवाळा गणपती मंदिर

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...